Odisha Train Accident : ओडिशातल्या (Odisha) रेल्वे अपघाताने सगळ्या देशाला हारवलं आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत 280 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असली तरी मृतांचा आकडा वाढतानाच दिसत आहे. शुक्रवारी संध्याकाळी मालगाडी आणि दोन प्रवासी गाड्यांमध्ये झालेल्या या अपघातांमुळे मृत्यू तांडव पाहायला मिळालं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnaw) यांनीही घटनास्थळी पोहोचत अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
ओडिशा रेल्वे अपघाताच्या भीषण दृश्यामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. अपघातातील मृतांचा आकडा 280 च्या वर गेला असून 900 हून अधिक लोक अजूनही जखमी आहेत. या अपघातात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक बचाव पथकांव्यतिरिक्त लष्कर आणि हवाई दलाचीही बचाव कार्यात मदत घेण्यात येत आहे. जखमींना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढले जात आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव शनिवारी सकाळी बचावकार्याची प्रगती जाणून घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.
अपघाताचं कारण काय?
या भीषण रेल्वे अपघाताचे कारण काय, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर रेल्वेमंत्र्यांनी याबाबत भाष्य केले. "कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे मंत्रालयाने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. समिती संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या अपघातात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. आपण स्वतः या प्रकरणाच्या तळाशी जाणार असून कारण हाती लागेपर्यंत गप्प बसणार नसणार आहोत," असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
नेमकं काय झालं?
हावडाला जाणाऱ्या 12864 बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे बहानगा बाजार येथे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या रेल्वे रुळांवर जाऊन पडले. रुळावरून घसरलेले हे डबे 12841 या शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले आणि कोरोमंडलचेही डबे उलटले. कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानंतर मालगाडीला धडकले, त्यामुळे मालगाडीही अपघाताच्या कचाट्यात आली. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आधी कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली आणि तिचे 10-12 डबे बेंगळुरू-हावडा एक्सप्रेसच्या रुळांवर पडले आणि त्यानंतर मालगाडीचा अपघात झाला.
रेल्वेच्या अधिकृत निवेदनानुसार, शालिमार वरुन चेन्नईला निघालेल्या कोरोमंडल एक्सप्रेसचे 10-12 डबे बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरले. हे डबे बाजूच्या रुळावर उलटले. याच रुळावरुन ट्रेन क्रमांक 12864 बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस पुढे जात होती. मात्र ती कोरोमंडल एक्स्प्रेसच्या बोगीला धडकली. यानंतर बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचेही अनेक डबे रुळावरून घसरले. या दोन्ही एक्सप्रेसचे डबे मालगाडीला धडकले आणि त्यामुळे हा अपघात मोठा झाला.
कोरोमंडल एक्सप्रेसचे B2 ते B9 हे डबे उलटले होते. त्याचवेळी A1-A2 चे डबेही रुळावरून उलटले. तर कोच B1 तसेच इंजिन रुळावरून घसरले आणि शेवटी H1 आणि GS कोच रुळावरच राहिले होते. बेंगळुरू हावडा मेलच्या एका GS कोचचे नुकसान झाले. यासोबतच मागील बाजूचा जीएस कोच आणि दोन बोगी रुळावरून घसरून उलटल्या. तर कोच ए 1 ते इंजिनपर्यंतची बोगी रुळावरच होत्या.