जैश-ए-मोहम्मदच्या टार्गेटवर NSA अजित डोवाल

शत्रूला घरात घुसून मारणं अजित डोवालांची खासियत  

Updated: Feb 13, 2021, 08:15 PM IST
जैश-ए-मोहम्मदच्या टार्गेटवर NSA अजित डोवाल title=

नवी दिल्ली : शत्रूच्या उरात धडकी भरवणारा कर्तबगार अधिकारी ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची खरी ओळख. हेच अजित डोवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  भारताच्या सुरक्षेला अबाधित ठेवायची जबाबदारी शीरावर घेतलेली व्यक्ती म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. आय पी एस अधिकारी असलेले अजित डोवाल यांनी आतापर्यंत देशाच्या अखंडतेला धक्का पोहोचवू पाहणारे अनेक कट हाणून पाडले आहेत. 

त्यामुळेच भारताचा शत्रू क्रमांक एक असलेल्या पाकिस्तानची नजर स्वाभाविकपणे अजित डोवाल यांच्यावर आहे. घातपाताचे मनुसबे उधळून लावणारे अजित डोवाल हे धडाडीचे अधिकारी, पाकिस्तानला सतत खुपत असतात. म्हणूनच जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं अजित डोवाल यांच्याविरोधात षडयंत्र रचलं आहे.

अजित डोवाल यांच्या घराची, कार्यालयाची व्हीडिओ रेकी जैशच्या दहशतवाद्याकडून करण्यात आली. काश्मीरमधल्या शोपियनमध्ये राहणारा जैशचा दहशतवादी हिदायत उल्लाह मलिक याने, 24 मे 2019 या दिवशी श्रीनगर ते दिल्ली विमान प्रवास केला. दिल्लीत त्याने सरदार पटेल भवनातल्या डोवालांच्या कार्यालयाची रेकी केली. 

हा व्हीडिओ त्यानं व्हॉट्स ऍपवरून पाकिस्तानमधल्या हँडलरला पाठवला. या हँडलरचं नाव डॉक्टर असं सांगितलं जातं आहे. तर रेकी करणारा हिदायत हा जैशच्याच लष्कर-ए-मुस्तफाचा प्रमुख आहे. त्याला काश्मीरमधल्या अनंतनागमधून 6 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. त्याच्याकडे शस्त्रास्त्र आणि दारुगोळयाचा साठा सापडला होता.

या पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांची सुरक्षा व्यवस्था कमालीची वाढवण्यात आली आहे. मात्र पाकिस्तान आणि त्यांची विषारी दहशतवादी पिलावळ बहुतेक विसरली आहे की शत्रूला त्यांच्याच घरात घुसून मारणं हा अजित डोवाल यांचा खाक्या आहे. त्यामुळे पाकिस्ताननं आता स्वतःची आणि आपल्या दहशतवाद्यांची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. कारण त्यांनी अजित डोवाल यांना डिवचलं आहे.