नवी दिल्ली : ज्या वयात लोकं निवृत्ती घेऊन आराम करण्याच्या विचारात असतात, त्यापेक्षा अधिक वयात एका आजीबाईंनी नारी सशक्तीकरणाचं नवं उदाहरणचं समोर ठेवलं आहे. चंद्रो तोमर Chandro Tomar या आजीबाई 'शूटर दादी' म्हणून प्रसिद्ध आहेत. केवळ भारतातच नाही तर विदेशातही 'शूटर दादी'ची चर्चा आहे. ८७ वर्षीय आजी गावातील मुलांना शूटिंगचं ट्रेनिंग देण्याचं काम करतात. सतत डोक्यावर पदर घेऊन, पडद्याआड राहणाऱ्या आजी वर्तमानपत्रांसाठी एक मोठा चेहरा बनल्या.
उत्तर प्रदेशमधील तरुणांना शूटिंगसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि ट्रेनिंग देण्यासाठी जोहरी रायफल क्लबचे अध्यक्ष डॉ. राजपाल सिंह यांनी शूटिंग रेंजची स्थापना केली. या शूटिंग रेंजमध्ये 'शूटर दादी'ची नात शेफाली ट्रेनिंगसाठी जाऊ लागली.
शेफालीसोबत शूटर दादीही शूटिंग रेंजमध्ये जात होती. याबाबत बोलताना शेफालीने सांगितलं की, एक दिवस तिला रायफल लोड करताना समस्या येत होती. त्यावेळी आजीने तिला रायफल लोड करण्यासाठी मदत केली. आणि तीच आजीच्या आयुष्याची नवी सुरुवात होती. आम्हाला सर्वांना केवळ बघत-बघतच आजीने पहिला निशाणा लावला असल्याचं शेफालीने सांगितलं.
डॉ. राजपाल सिंह यांना आजीला एक संधी देण्याचा विचार केला. परंतु यासाठी आजीला त्यांच्या कुटुंबाकडून पाठिंबा नव्हता. 'शूटर दादी'चे कुटुंबिय आजीच्या या खेळाच्या विरोधात होते.
परंतु आपल्या जिद्दीच्या बळावर आजीने पहिल्यांदा त्यांच्या नातीसोबत एका स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेसाठी त्यांची वयोवृद्ध वर्गात नोंदणी करण्यात आली होती. पहिल्याच स्पर्धेत आजी आणि शेफाली या दोघींनीही बाजी मारली. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोटो स्थानिक वृत्तपत्रात छापून आला. आजीने कुटुंबिय फोटो पाहतील या भीतीने वृत्तपत्र लपवलं. पण कुटुंबियांकडून वृत्तपत्रातील तो फोटो पाहण्यात आला आणि आजीला यासाठी मोठा विरोध झाला. आजीला शूटिंग रेंजमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली. पण 'शूटर दादी'ने त्यांची प्रॅक्टिस सुरुच ठेवली.
आजीला वेगवेगळ्या स्पर्धांसाठी परदेशात जावं लागतं. आजीला इंग्रजी बोलता येत नाही. पण तिच्या नवीन गोष्टी शिकण्याच्या वृत्तीने ती आता काही प्रमाणात इंग्रजी समजतं असल्याचं शेफालीने सांगितलं. अनेक जण 'शूटर दादी'ला या वयातही इतक्या उत्साहाने, सहजपणे काम करत असल्याबाबत विचारल्यावर आजी, 'शरीर वृद्ध होतं, मन वृद्ध होत नसल्याचं' उत्तर देते.
आजीच्या या प्रेरणादायी आयुष्यावर 'सांड की आँख' हा चित्रपटही साकारण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री भूमि पेडनेकर आणि तापसी पन्नू यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 'शूटर दादी' केवळ गावातील मुली, महिलांसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरत आहेत.