Ashram Empire Of Asaram Bapu: स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला (Asaram Bapu) गंधीनगरमधील सेशन्स कोर्टाने जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावली आहे. सूरतमधील (Surat Rape Case) एका तरुणीवर केलेल्या बलात्कार प्रकरणामध्ये ही शिक्षा सुनावण्यात आल्याने आधीच तुरुंगावस भोगत असलेल्या आसारामचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे. मात्र आसाराम तुरुंगामध्ये असतानाही त्याच्या आश्रमाचं 10 हजार कोटींचं सम्राज्य अद्यापही सुरळीतपणे सुरु आहे.
400 हून अधिक आश्रम, 1500 हून अधिक सेवा समिती, 17 हजारांहून अधिक बाल संस्कार केंद्र, 40 हून अधिक गुरुकुल असा सारा पसारा आसारामच्या 10 हजार कोटींच्या धार्मिक सम्राज्याचा भाग आहे. एकाच ट्रस्टच्या माध्यमातून या संपत्त्यांची देखरेख ठेवली जाते. या ट्रस्टच्या माध्यमातूनच सर्व आर्थिक व्यवहार केले जातात. मात्र या ट्रस्टचा सर्व कारभार कोण पाहतं? आसाराम तुरुंगात असताना या सर्व आश्रमांचे प्रमुखपद कोणाकडे आहे? कोण या सर्व व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...
आसाराम यांच्या मालकीच्या या सर्व आश्रम आणि संपत्त्यांची देखभाल आसाराम करत नाही आणि तुरुंगामध्ये असलेला त्याचा मुलगा नारायण साईही (Narayan Sai) संभाळत नाही. सध्या हा सर्व कारभार आसारामची मुलगी भारती संभाळते. संत श्री आसारामजी ट्रस्ट नावाने चॅरिटेबल संस्था आहे. या संस्थेचं मुख्य कार्यालय अहमदाबादमध्ये आहे. बारती सध्या या ट्रस्टमधील दैनंदिन कारभारांवर लक्ष ठेऊन आहे.
जे लोक भारती यांच्याबरोबर असतात त्यांच्या सांगण्यानुसार या आश्रमांसंदर्भातील कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात. देशभरातील 30 वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आश्रमांच्या दैनंदिन व्यवसाहांसंदर्भात नियंत्रण त्यांनी आपल्या हाती ठेवलं आहे. आसाराम बापू्प्रमाणे भारती वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन प्रवचन किंवा जाहीर कार्यक्रम करत नाही. उलट भारती या त्यांचं काम आणि आश्रमासंदर्भातील व्यवहार प्रसरामाध्यमांच्या नजरेतून दूर असतील याची काळजी घेतात.
आसारामने अहमदाबादमधील आपलं पहिलं आश्रम उभारलं होतं. 1975 साली भारती यांचा जन्म झाला. जेव्हा सन 2013 मध्ये आसारामला अटक झाली तेव्हा भारती आणि आसारामची पत्नी लक्ष्मीदेवीलाही अटक करण्यात आली होती. मात्र नंतर भारती यांना सोडून देण्यात आलं. मागील आठ वर्षांमधील भारती यांची आश्रमांवरील आणि त्यांच्या व्यवहारांवरील पकड अधिक घट्ट झाली आहे.
आज सुनावण्यात आलेली शिक्षा आणि प्रकरणाचं गांभीर्य पाहता आसाराम लवकर तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता फारच कमी आहे. नारायण साईला सुद्धा लवकर दिलासा मिळणार नाही. या दोघांशिवाय आसामरामचं धार्मिक सम्राज्यचं कामकाज सामान्यपणे सुरु आहे. आसारामच्या भक्तांच्या संख्येत आणि दान म्हणून मिळणाऱ्या पैशांची आकडेवारी कमी झाली असली तरी त्याच्या भक्तांच्या दाव्यानुसार जाणूनबुजून त्याला अडकवण्यात आलं आहे.
आसारामच्या आश्रमाच्या अधिकृत वेबसाईटवर त्याला सोडवण्यासाठी मागील काही वर्षांपासून ऑनलाइन कॅम्पेनच्या माध्यमातून मोहिमा राबवल्या जात आहेत.