'मी बदला घेण्यासाठी...', भारताबद्दल शरीफ यांचं पाकमधील जाहीर सभेत वक्तव्य; काश्मीरचाही उल्लेख

Nawaz Sharif Speech After Returning To Pakistan: नवाझ शरीफ हे 4 वर्ष ब्रिटनमध्ये राहिल्यानंतर शनिवारी पाकिस्तानमध्ये परतले. यानंतर त्यांनी एका विशेष सभेला संबोधित करताना भारताबरोबरच्या संबंधांबद्दल भाष्य केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 22, 2023, 11:37 AM IST
'मी बदला घेण्यासाठी...', भारताबद्दल शरीफ यांचं पाकमधील जाहीर सभेत वक्तव्य; काश्मीरचाही उल्लेख title=
4 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये परतले नवाझ शरीफ

Nawaz Sharif Speech After Returning To Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ 4 पुन्हा मायदेशी परतले आहेत. स्वत:वर लादून घेतलेल्या निर्वासनाचा 4 वर्षांचा कालावधी ब्रिटनमध्ये घालवल्यानंतर नवाझ शरीफ शनिवारी पाकिस्तानात दाखल झाले. जानेवारी महिन्यात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी नवाझ शरीफ पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. विशेष विमानाने ते पाकिस्तानमध्ये आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे सर्वेसर्वा असलेले नवाझ शरीफ 'उमीद-इ-पाकिस्तान' या विशेष विमानाने दुबईहून पाकिस्तानमध्ये आले. यानंतर त्यांनि मिनार-इ-पाकिस्तान येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना भारताबरोबर चांगले संबंध हवेत असा थेट उल्लेख करत म्हटलं आहे.

आम्ही पाकिस्तानला वाघ बनवण्याचा प्रयत्न केला

"आम्ही पाकिस्तानला आशियामधील वाघ बनवण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही पाकिस्तानला जी-20 देशांमध्ये समावेश करुन घेण्यासाठी प्रयत्न करत होतो," असं नवाझ शरीफ आपल्या भाषणात म्हणाले. आपण सर्वांनी देशातील संविधानाला अधिक मजबूत करण्याची आणि अनेकदा देशाला प्रभावित करणाऱ्या आजाराला दूर करण्याची गरज आहे. आपल्याला नवीन सुरुवात करण्याची गरज आहे असं नवाझ शरीफ यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटलं आहे. 

बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला नसता तर...

नवाझ शरीफ यांनी आपल्या भाषणामध्ये शेजारच्या देशाबरोबर चांगले संबंध निर्माण करुन काश्मीरचा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवला पाहिजे असंही म्हटलं. "आम्हाला एका स्वतंत्र आणि व्यापक स्वरुपाच्या परराष्ट्र धोरणाची गरज आहे. आम्हाला जगाबरोबर सहकार्याने आणि समानतेनं राहायचं आहे. आम्हाला शेजारच्या देशाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करुन पाकिस्तानला एक आर्थिक दृष्ट्या सक्षम देश घडवायचा आहे. दुसऱ्यांशी लढून, संघर्ष करुन पाकिस्तानचा विकास होणार नाही. मी बदला घेण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी उत्सुक आहे. जर पाकिस्तान पूर्व पाकिस्तानपासून (बांगलादेशपासून) वेगळा झाला नसता तर भारतामधून जाणारा एक इकनॉमिक कॉरिडोअर तयार झाला असता. आम्हाला पाकिस्तानच्या विकासासाठी शेजाऱ्यांबरोबर आणि जगाबरोबर चांगले संबंध हवे आहेत," असं नवाझ शरीफ म्हणाले. 

मोदींनी पुढे केलेला मैत्रीचा हात

पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर शेजारच्या देशांकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. पाकिस्तान वगळता सगळ्यांनी भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला. डिसेंबर 2015 मध्ये पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावरुन अफगाणिस्तानला गेले आणि त्यानंतर अचानक ते पाकिस्तानला गेले होते. त्यांनी लाहोरमध्ये जाऊन तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी नवाझ शरीफ यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली होती. 

अचानक मोदी पाकिस्तानला गेलेले

मोदींच्या 3 दिवसांच्या दौऱ्यामधील अंतिम टप्प्यातील दौऱ्यामध्ये अचानक पाकिस्तानमध्ये त्यांचं विमान लॅण्ड झालं होतं. मोदींनी जवळपास 150 मिनिटं पाकिस्तानमध्ये हॉल्ट घेतला होता. तब्बल 11 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पाकिस्तानच्या भूमीवर उतरले होते. या दोन्ही नेत्यांनी जागतिक शांतता, दोन्ही देशांमधील सहकार्य यासारख्या गोष्टींवर चर्चा केली होती. मात्र त्यानंतरही भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने होणारे दहशतवादी हल्ले थांबले नव्हते. यानंतरच पुलवामा येथे भारतीय जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला पाकिस्तानने घडवून आणला. यानंतर भारताने पाकिस्तानवर आधी सर्जिकल स्ट्राइक आणि नंतर एअर स्ट्राइक केला होता.