अहमदाबाद : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही गुजरात विधानसभेसाठी प्रचार करणार नाहीत. जेडीयूनं गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये नितीश कुमार यांचं नाव नाही.
भाजपचा मित्रपक्ष असलेला जेडीयू गुजरातमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार आहे. गुजरातमधल्या १८२ पैकी ५० जागांवर जेडीयूनं उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांच्या जवळचे असलेले राज्यसभा खासदार आर.एस.पी.सिंग, जेडीयूचे महासचिव के.सी.त्यागी, बिहारचे मंत्री ललन सिंग आणि माजी मंत्री श्याम रजक गुजरात निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत.
नितीश कुमार यांनी बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेसपासून लांब होत भाजपला जवळ केलं आणि पुन्हा एकदा नवं सरकार बनवलं. गुजरातमध्ये प्रचाराला गेलं तर मोदींवर आणि भाजप सरकारवर टीका करावी लागेल, म्हणून नितीश कुमार यांनी गुजरातमध्ये प्रचाराला जाणं टाळलंय का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.