नितिन गडकरी यांची EV बाबत जबरदस्त घोषणा; कार-बाईकचालकांमध्ये आनंदाचे वातावरण

Nitin Gadkari on Electric Vehical : तुम्हीही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की...

Updated: Mar 23, 2022, 08:15 AM IST
नितिन गडकरी यांची EV बाबत जबरदस्त घोषणा; कार-बाईकचालकांमध्ये आनंदाचे वातावरण title=

नवी दिल्ली : Nitin Gadkari on Electric Vehical : तुम्हीही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की, पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने असतील. 

इलेक्ट्रिक वाहनांची किंमत होणार कमी 

गडकरी म्हणाले की, तंत्रज्ञान आणि हरित इंधनातील प्रगतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होतील. यामुळे पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीने होईल. ही बाब देशभरातील वाहन वापरकर्त्यांसाठी क्रांती ठरेल.

प्रदूषणाची पातळीही कमी

नितीन गडकरी मंगळवारी लोकसभेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2022-23 च्या अनुदानाच्या मागण्यांवर उत्तर देत होते. प्रभावी स्वदेशी इंधनाकडे जाण्याच्या गरजेवर भर देऊन गडकरींनी आशा व्यक्त केली की लवकरच इलेक्ट्रिक इंधन प्रत्यक्षात येईल. त्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी होईल.

हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा आग्रह

खासदारांनी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन गडकरींनी केले. त्यांनी खासदारांना आपापल्या भागातील सांडपाणी ग्रीन हायड्रोजनमध्ये बदलण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले. लवकरच हायड्रोजन हा सर्वात स्वस्त इंधन पर्याय असेल असेही त्यांनी सांगितले.

पेट्रोल वाहनांच्या बरोबरीची किंमत 

गडकरी म्हणाले, 'लिथियम आयन बॅटरीच्या किमती झपाट्याने कमी होत आहेत. आपण झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरी विकसित करीत आहोत. जास्तीत जास्त दोन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटो रिक्षाची किंमत पेट्रोलवर चालणारी स्कूटर, कार, ऑटो रिक्षाच्या बरोबरीची असेल.

पेट्रोलवर 100 रुपये आणि ईव्हीवर 10 रुपये

गडकरी म्हटले की,  तुम्ही आज पेट्रोलवर 100 रुपये खर्च करत असाल तर इलेक्ट्रिक वाहन चालवताना हा खर्च 10 रुपयांवर येईल. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजन फ्युएल कार लॉन्च केली होती.