Covid-19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; 10 राज्यांमध्ये पसरला JN.1

Covid-19 Sub Variant JN.1: INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील कोरोनाच्या या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील दहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये  JN.1 हा सब व्हेरिएंट आढळून आला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 2, 2024, 06:57 AM IST
Covid-19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; 10 राज्यांमध्ये पसरला JN.1 title=

Covid-19 Sub Variant JN.1: भारतात कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 चे देशातील अनेक भागांमध्ये रूग्ण आढळून येत आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला देखील या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 200 च्या जवळपास पोहोचली आहे. INSACOG च्या आकडेवारीनुसार, JN.1 सब व्हेरिएंटची एकूण रूग्णसंख्या 196 आहे. 

INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील कोरोनाच्या या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील दहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये  JN.1 हा सब व्हेरिएंट आढळून आला आहे. 

केरळमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद

भारतातील SARS-CoV-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या नुसार, आत्तापर्यंत केरळमध्ये JN.1 चे सर्वाधिक 83 रुग्ण आढळले आहेत. यानंतर गोव्यात 51, गुजरातमध्ये 34, कर्नाटकात 8, महाराष्ट्रात 7, राजस्थानमध्ये 5, तामिळनाडूमध्ये 4, तेलंगणात 2 आणि ओडिशा आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे.

INSACOG च्या डेटानुसार, डिसेंबर महिन्यात देशात कोविडच्या एकूण रूग्णसंख्येपैकी 179 रूग्ण JN.1 व्हेरिएंटचे होते. तर नोव्हेंबरमध्ये याचे एकूण 17 रूग्ण सापडले होते. 

मुंबईत सापडले इतके रूग्ण

1 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबईत कोरोना (Mumbai Corona) बाधित रुग्णांची संख्या 228 एवढी नोंदवण्यात आलीये. याशिवाय उपचार घेऊन बरे झालेल्या 98 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत विविध रुग्णालयात 130 रुग्ण हे कोरोना बाधित एक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या अहवालातील माहितीवरून स्पष्ट होतोय.

ठाणे, पुणे, अकोला, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. JN.1 व्हेरियंट हा BA.2.86 चा वंशज आहे. याला पिरोला म्हणून ओळखलं जायचं. JN.1 च्या पहिल्या रुग्णाची नोंद केरळमध्ये झाली होती. एका ७९ वर्षीय महिलेला याची लागण झाली होती. त्यानंतर तो देशभरात पसरु लागला आहे.