डिसेंबर महिन्यात बदलणार 'हे' नियम; पाहा सर्वसामान्यांना फायदा होणार की खर्चाची फोडणी बसणार

New Rules from December 1, 2023 : पाहून घ्या 1 डिसेंबरपासून नेमके कोणते नियम बदलायत आणि त्यांचा तुमच्यावर काय परिणाम होतोय. कारण बरेच नियम बदलतायत.   

सायली पाटील | Updated: Nov 30, 2023, 03:36 PM IST
डिसेंबर महिन्यात बदलणार 'हे' नियम; पाहा सर्वसामान्यांना फायदा होणार की खर्चाची फोडणी बसणार  title=
new rules from december 2023 latets update and details

New Rules from December 1, 2023 : भारतामध्ये दर महिन्याच्या अखेरीस नव्या महिन्यापासून नियमांमध्ये नेमके कोणते आणि किती बदल होणार याचीच धाकधूक सर्वांना लागलेली असते. नोव्हेंबर महिन्याचा शेवट होताना आणि वर्षातला शेवटचा म्हणजेच डिसेंबर महिना सुरु होतानासुद्धा असेच काही नियम बदलणार आहेत, या बदलांचा तुमच्यावर आणि तुमच्या आर्थिक गणितांवर थेट परिणाम होणार आहे. काय आहेत हे बदल? पाहून घ्या.... 

Sim खरेदीविषयक बदल 

नव्यानं सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आता नियम बदलण्यात आले आहेत. ज्यामुळं केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाला सिमकार्ड दिलं जाणार नाही. केवायसीशिवाय एकाच वेळी अनेक सिमकार्ड खरेदीवरही बंदी लावण्यात आली आहे. या नियमांचं पालन न झाल्यास 10 लाख रुपयांचा दंड ठोठावत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

पेन्शन 

पेन्शन सुरु ठेवण्यासाठी  (Pensioners Rule) आता 60 ते 80 वर्षांच्या वयोगटातील मंडळींनी हयातीचा दाखला बँकेमध्ये जमा करणं अपेक्षित असेल. असं न केल्यास तुमची पेन्शन थांबवली जाऊ शकते. 

LPG चे दर 

ऑईल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस दरांमध्ये बदल करतात. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला असाच बदल समोर येऊ शकतो. यापूर्वी इंधन कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शिअल सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ केली होती. आता यावेळी या नियमांमध्ये कोणता आणि किती फरक पडतो महत्त्वाचं असेल. 

हेसुद्धा पाहा : सुट्ट्यांमध्ये परदेशात जायचंय पण व्हिसा नाही? ही शक्कल वापरून तर पाहा... 

... तर बँकांनाही दंड 

हा नियम बँकांना झटका देऊ शकतो. कारण, 1 डिसेंबरपासून बँकांसाठीचा एक नियम बदलणार आहे. आरबीआयनं यासंदर्भातील माहिती यापूर्वीच जाहीर केली आहे. ज्यानुसार कोणाही ग्राहकाद्वारे कर्ज फेडल्यानंतर गॅरंटीच्या रुपात सुपूर्द केलेली कागदपत्र परत न केल्यास त्या बँका दंडात्मक कारवाईस पात्र ठरतील. 

HDFC क्रेडिट कार्ड

एचडीएफसी बँकेकडून रेगलिया क्रेडिट कार्ड (HDFC Regalia Credit Card) वर दिल्या जाणाऱ्या लाऊंज सुविधेमध्ये बदल केला आहे. ज्यामध्ये आता या लाऊंजमध्ये अॅक्सेस मिळवण्यासाठी कार्डधारकाला दर तीन महिन्यंनी एक लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा पूर्ण करावी लागेल.