नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधींच्या वकिलांकडून सुब्रमण्यम स्वामींची उलटतपासणी

या प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनीच सोनिया आणि राहुल गांधींविरोधात खासगी गुन्हेगारी तक्रार दाखल केली आहे.

Updated: Feb 4, 2019, 02:57 PM IST
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधींच्या वकिलांकडून सुब्रमण्यम स्वामींची उलटतपासणी title=

नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि सध्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वकिलाकडून तक्रारदार आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची उलटतपासणी सुरू करण्यात आली. या प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनीच सोनिया आणि राहुल गांधींविरोधात खासगी गुन्हेगारी तक्रार दाखल केली आहे. पण खटल्यातील सर्व आरोपींनी त्यांच्यावरील आरोप याआधीच फेटाळले आहेत.

सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी आरोपींनी निधीचा गैरव्यवहार आणि फसवणूक केल्याचा आरोप ठेवला आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाने कर्ज दिल्याच्या मोबदल्यात नॅशनल हेराल्डची दोन हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. काँग्रेसने आधी असोसिएट्स जर्नल्स लिमिटेडला २६ फेब्रुवारी २०११ रोजी ९० कोटी रुपयांचे कर्ज दिले. त्यानंतर पाच लाख रुपयांच्या साह्याने यंग इंडिया नावाची कंपनी स्थापित केली. या कंपनीमध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांची ३८-३८ टक्क्यांचा हिस्सा होता. त्यानंतर १०-१० रुपयांचे नऊ कोटी शेअर यंग इंडिया कंपनीला दिले गेले. त्याबदल्यात यंग इंडियाला काँग्रेसचे कर्ज चुकते करायचे होते. नऊ कोटी शेअरच्या साह्याने यंग इंडियाकडे असोसिएट जर्नल्स लिमिटेडचे ९९ टक्के शेअर आले. त्यानंतर काँग्रेसने ९० कोटी रुपयांचे कर्जही माफ केले. या माध्यमातून यंग इंडिया कंपनीला मोफतपणे असोसिएट्स जर्नल्स लिमिटेडची मालकी मिळाली. त्यावर सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या तक्रारीत आक्षेप घेतला.