मुंबई : मोबाईल टॉवरच्या प्रकरणात रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांना मोठा झटका बसलाय. आता त्यांना लिखित उत्तर द्यावं लागणार आहे. मोहाली जिल्हा न्यायालयात बुधवारी सेक्टर ७१ स्थित स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये रिलायन्सद्वारे लावण्यात आलेल्या मोबाईल टॉवरच्या प्रकरणात सुनावणी झाली. या दरम्यान रिलायन्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी आणि कंपनीचे डायरेक्टर संजय मशरुवाला यांना झटका देत न्यायालयानं त्यांची याचिका रद्दबादल ठरविली. या याचिकेत त्यांनी या प्रकरणात आपल्याला सहभागी करू नये, असं त्यांनी म्हटलं होतं.
नागरिकांचे वकील म्हणून अॅड. नवीन सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी आणि मशरुवाला यांना लिखित उत्तर देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी १६ जून रोजी होणार आहे.
सेक्टर ७१ स्थित स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये रिलायन्सद्वारे मोबाईल टॉवर लावण्यात आला होता. त्याच्याविरोधात नागरिकांनी कंपनीला कोर्टात खेचलं. टॉवरमुळे या परिसरात कॅन्सरचा धोका वाढल्याचा दावा, नागरिकांनी केलाय. कंपनीनं नागरिकांच्या सूचना न जुमानता जबरदस्तीनं तिथं हा मोबाईल टॉवर उभारला होता.