Mudhol Hound: मोदींच्या सुरक्षेसाठी मुधोळ हाऊंड्स

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) सुरक्षेसाठी एक नवा प्लॅन आखण्यात आलाय.

Updated: Aug 22, 2022, 11:38 PM IST
Mudhol Hound: मोदींच्या सुरक्षेसाठी मुधोळ हाऊंड्स title=

Mudhol Hound Dogs in PM Modi Security : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) सुरक्षेसाठी एक नवा प्लॅन आखण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये ज्यांनी शौर्य गाजवलं, तेच आता मोदींच्या सुरक्षेसाठी सज्ज होतायत. मुधोळ हाऊंड.  नावच असं जबरदस्त. की ऐकणाऱ्याला जरब बसावी. निष्ठेसाठी ओळखले जाणारे हे कुत्रे. नजर तीक्ष्ण, शौर्य आणि प्रामाणिकपणा म्हणजे मुधोळ हाऊंड.  आता या जातीच्या कुत्र्यांवर मोठी जबाबदारी येणार आहे ती म्हणजे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेची. (mudhol hounds sharp sighted desi dog breed who joined spg squad for prime minister narendra modi Security)

या श्वानांचा समावेश आता पंतप्रधानांच्या स्पेशल प्रॉटेक्शन ग्रुप अर्थात एसपीजीमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी या मुधोळ हाऊंडसना चार महिने अत्यंत कठोर ट्रेनिंग दिलं जाणार आहे.

मुधोळ हाऊंड कुत्रे लांब असतात आणि त्यांची शारीरिक बांधणी उत्तम असते. तीक्ष्ण नजरेमुळे त्यांना साइट हाउंड असंही म्हणतात. मुधोळ हाऊंड 270 डिग्रीत पाहू शकतात. इतर कुत्र्यांपेक्षा यांची वास घेण्याची क्षमता तीव्र आहे.  उत्तम रोगप्रतिकारक क्षमता असलेले हे कुत्रे कमी थकतात आणि कमी आजारी पडतात.

कुठल्याही हवामानात काम करण्याची त्यांची क्षमता आहे. अन्य देशी कुत्र्यांपेक्षा मुधोळ हाऊंडमध्ये शौर्य आणि प्रामाणिकपणा जास्त असतो. कर्नाटकात टायगर रिझर्वमध्ये वाघांच्या सुरक्षेसाठी मुधोळ हाऊंड कुत्रे तैनात असतात.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्येही मुधोळ हाऊंड कुत्र्यांचा समावेश होता. 

एअरफोर्स, पॅरामिलिट्री, डीआरडीओ, राज्य पोलीस दलात मुधोळ हाऊंडसनी उत्कृष्ट कामगिरी केलीय. आता त्यांच्यावर पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या सुरक्षेची नवी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्येही मुधोळ हाऊंडस जबरदस्त कामगिरी करतील, यात शंका नाही.