'मिस्टर ३६' ना जराही शरम नाही; राहुल गांधींचा मोदींवर हल्ला

सर्जिकल स्ट्राईकचा वापर राजकीय भांडवल म्हणून केला.

BGR | Updated: Dec 8, 2018, 06:09 PM IST
'मिस्टर ३६' ना जराही शरम नाही; राहुल गांधींचा मोदींवर हल्ला title=

नवी दिल्ली: सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण केल्याच्या मुद्द्यावरून लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांनी मोदी सरकारचे कान टोचल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरी जळजळीत टीका केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांनी सच्च्या सैनिकाप्रमाणे परखड मत मांडले. भारतीय लष्कराचा वैयक्तिक मालकीच्या गोष्टीप्रमाणे वापर करायला 'मिस्टर ३६' ना जराही शरम वाटत नाही. त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचा वापर राजकीय भांडवल म्हणून केला. तसेच राफेल कराराच्या माध्यमातून अनिल अंबानी यांना ३० हजार कोटींची फायदा करून दिला, असा आरोप राहुल यांनी केला. राहुल गांधी यांच्या पंतप्रधानांवरील थेट टीकेमुळे भाजप व काँग्रेसमध्ये वाकयुद्ध पेटण्याची शक्यता आहे. 

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांनी सैन्य साहित्य महोत्सवात बोलताना सर्जिकल स्ट्राईकवरून झालेल्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्जिकल स्ट्राइकचा प्रमाणापेक्षा जास्त प्रचार केला गेला. लष्कराची ही कारवाई महत्वाची होती आणि आम्हाला ती यशस्वी करायची होती. पण त्यावर किती राजकारण झाले. ते योग्य की अयोग्य हे राजकीय पक्षांच्या नेत्यांना विचारायला हवे. ठराविक व्हिडिओ आणि फोटो लीक करुन या लष्करी मोहिमेला राजकीय रंग देण्यात आला. सर्जिकल स्ट्राइकच्या या अतिशयोक्तीचा म्हणावा तितका फायदाही झाला नाही. लष्करी मोहिमांना राजकीय रंग देणे चांगले नाही, असे हुड्डा यांनी म्हटले होते. 

भारतीय लष्कराने सप्टेंबर २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. त्यावेळी डी.एस.हुड्डा उत्तरी सैन्य विभागाचे कमांडर होते.