MP News : मियां-बीबी राजी तो क्या करेगा काजी असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण एका तरुणाला या म्हणीच्या अगदी विरुद्ध अनुभव नुकताच आला. या प्रकरणात मियां-बीबी राजी होते पण काजी मात्र हट्टाला पेटून उठला होता. या वराचा विवाह लावून देण्यास काझीने नकार दिल्याने मोठा गोंधळ उडाला होता. मात्र अथक प्रयत्नानंतर काझीचे मन वळवण्यात यश आले आणि त्याने विवाह लावून दिला.
मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. निकाल करण्यासाठी डीजेसह वरात घेऊन हा तरुण आला होता. मात्र डीजे पाहून काझीने विवाह लावून देण्यास नकार दिला आणि डीजेवाल्याला विवाह लावायला सांगा असे म्हटले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेवटी काझीचे मन वळवल्यानंतर निकाह लावण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी हा तरुण डीजेसह वरात घेऊन विवाहासाठी निघाला होता. मात्र विवाह लावणार्या काझीला राग आला. काझींनी निकाह लावण्यास नकार दिला. आम्हाला संपूर्ण शहरात उत्तर द्यावे लागते. दोन-अडीच वर्षे झाली, तेव्हापासून लग्नात ढोल-ताशे वाजवण्याचे धाडस कोणी केले नाही, अशा शब्दात काझीने वराला आणि त्याच्या कुटुंबियांना सुनावले.
"आम्हाला नोकर समजू नका. तुम्ही शरियतची चेष्टा केली, उलेमांची चेष्टा केली, संपूर्ण समाजाची चेष्टा केली. हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही डीजे मशिदीत नेला. तुम्ही सैतानला खूश करण्याचे काम केले," असे काझींनी म्हटले. यानंतर नाराज झालेल्या काझींनी विवाह लावण्यास नकार दिला. काझीच्या नाराजीनंतर दोन्ही बाजूच्या लोकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. चार तासांच्या प्रयत्नांनंतर काझीने निकाल लावण्यास होकार दिला. मात्र त्या तरुणाला कॅमेरासमोर माफी मागायला सांगितली.
मध्यप्रदेश छतरपुर में बारात में डीजे लाने पर काजी साहब ने निकाह पढ़ाने से इंकार किया....अगर काजी ही निकाह से इंकार कर दे तो हर गलत रितिरिवाज खत्म हो जायेगे.... pic.twitter.com/hgMbQ44YSG
— Yasmeen Khan (@YasmeenKhan_786) February 19, 2023
रात्री दीडच्या सुमारास वधू-वरांना मंचावरून जाहीर माफी मागावी लागेल, या अटीवर काझींनी विवाहासाठी होकार दिला होता. माफी मागितल्यावर मग विवाह लावून देण्यात आला. काझी मुनव्वर रझा यांच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम समाजाच्या पहिल्या दोन बैठका झाल्या होत्या ज्यामध्ये लग्नसमारंभात डीजे न वाजवण्यावर एकमत झाले होते. या बैठकीला समाजातील मान्यवर उपस्थित होते. मात्र यानंतरही डीजे लावून वरात काढण्यात आली.
दरम्यान, छतरपूरच्या अंजुमन इस्लामिया कमिटीचे हाजी शहजाद अली यांनी सांगितले की, येथे डीजेवर बंदी आहे. स्थानिक उलेमा, काझी, अंजुमन समितीने मिळून हा निर्णय घेतला होता. नाच-गाणी होणार नाहीत, माता-भगिनी नाचणार नाहीत असे यामध्ये ठरवण्यात आले होते. मात्र नौगाव येथे त्यांनी आमच्या नियमांचे उल्लंघन केले, त्यामुळे निकाह न करण्याच्या सूचना दिल्या होत्या.