नवी दिल्ली : देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत चर्चा सुरू असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, देशात 1930 पासूनच मुस्लिम समाजाची जनसंख्या वाढवण्याचे संघटीत प्रयत्न केले जात आहे. कारण या समाजाचे वर्चस्व वाढल्याने या देशाला पाकिस्तान बनवता येईल. देशाची विभागणी करून अशा विचारच्या लोकांचे काही हेतु साध्य देखील झाले आहे. तसेच ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्य होतात त्या ठिकाणी इतर लोकांना काढून टाकण्यात येते.
सिटिजनशिप डिबेट ओवर एनआरसी ऍंड सीएए आसाम ऍंड द पॉलिटिक्स ऑफ हिस्ट्री या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने भागवत बोलत होते. यावेळी भागवत यांनी म्हटले की, 1930 पासूनच नियोजित पद्धतीने मुस्लिम जनसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. मुस्लिम समाजाची जनसंख्या वाढल्यास ते आपले वर्चस्व स्थापित करतील. आणि मग या देशाला पाकिस्तान बनवायचे. हेच धोरण पंजाबबद्दल देखील होते, हेच सिंध, आसाम, बंगालबाबतही आहे.
भारताची फाळणी करण्याचा काहींचा हेतु साध्य झाला. परंतु त्यांना जसा हवा तसा झाला नाही. आसाम नाही मिळाले, बंगाल अर्धेच मिळाले, पंजाब अर्धेच मिळाले. त्यानंतर दोन प्रकारे नियोजन करण्यात आले. काही लोकं पाकिस्तानातून पीडित होऊन, शरणार्थी म्हणून यायेच, काही लोकं चुकून भारतात आले. इत्यादी पद्धतीने मुस्लिम जनसंख्या वाढवण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न आजवर करण्यात आले. आजही होत आहेत.