नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांचे हे सभागृहातील शेवटचे भाषण आहे. याची पूर्ण जाणीव ठेवत पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेसमोर आपल्या सरकारची भूमिका सविस्तरपणे मांडली. यावेळी मोदी यांनी बेरोजगारी, राफेल घोटाळा, महागाई, देशातील स्वायत्त संस्थांची मुस्कटदाबी अशा विरोधकांच्या जवळपास प्रत्येक आक्षेपाला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या दीर्घकालीन राजवटीवर टीका करताना ५५ वर्षांचा सत्ताभोग विरुद्ध भाजप सरकारचा ५५ महिन्यांचा सेवाभाव अशी तुलना करत सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा पाढा वाचला. तब्बल दोन तास चाललेल्या या भाषणात मोदींनी विरोधकांचा जवळपास प्रत्येक आक्षेप मोडीत काढला. तसेच आगामी निवडणुकीत जनता पुन्हा भाजपलाच सत्ता देईल, असा विश्वास व्यक्त केला.
उलटा चोर चौकीदार को दाटे
भाजप सरकारकडून देशातील स्वायत्त संस्थांच्या होणाऱ्या मुस्कटदाबीच्या आक्षेपाला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसला धारेवर धरले. देशात आणीबाणी काँग्रेसने आणली, लष्करप्रमुखांना गुंड काँग्रेसने म्हटले, लष्करावर सरकार उलथवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला, न्यायपालिकेला महाभियोगाची भीती काँग्रेसने दाखविली, नियोजन आयोगाला विदुषकांचा समूह काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांनी म्हटले. इतके सगळे करूनही मोदी स्वायत्त संस्था संपवतायत, असा आरोप काँग्रेस करते. हा म्हणजे 'उलटा चोर चौकीदार को दाटे', असा प्रकार असल्याची टीका मोदींनी केली.
कर्जमाफी काँग्रेसची दशवार्षिक योजना
पंतप्रधान मोदी यांनी कर्जमाफीच्या मुद्दयावरून काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेस दर दहा वर्षांनी शेतकऱ्यांना ५० ते ६० हजार कोटींची कर्जे माफ करते. मात्र, आमच्या सरकारने घोषणा अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा ६००० रुपये देण्याच्या घोषणेमुळे १२ कोटी शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे. प्रत्येक वर्षाचा हिशोब करायचा झाल्यास साडेसात लाख कोटी रुपये शेतकऱ्यांनी मिळतील. काँग्रेसच्या काळातील ९९ अपूर्ण सिंचन योजनांचे काम आम्ही पूर्ण केले.
५५ वर्षांचा सत्ताभोग वि. ५५ महिन्यांचा सेवाभाव
आजच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि भाजपच्या राजवटीची तुलना करत विरोधकांवर आगपाखड केली. काँग्रेसच्या काळात भूमिपूजन झालेल्या अनेक योजना आम्ही पूर्णत्वाला नेल्या. काँग्रेसने निवडणुकीच्या प्रत्येक जाहीरनाम्यात तीच आश्वासने नव्याने देण्यात धन्यता मानली. स्वातंत्र्यानंतर विकास करताना एवढ्या अडचणी येत नव्हत्या. त्यावेळी काँग्रेसने प्रत्येक गावात वीज पोहोचवायचे ठरवले असते तर पहिल्या २० वर्षांतच हे उद्दिष्ट पूर्ण झाले असते. मात्र, हे काम आता मला पूर्ण करावे लागत असल्याचे मोदींनी सांगितले.
महागठबंधन नव्हे महाभेसळ
राज्यात एकमेकाचे तोंड न पाहाणारे माझ्याविरोधात कोलकात्यात एकाच व्यासपीठावर आले. हे 'महागठबंधन' नसून 'महाभेसळ' आहे, अशा शब्दांत निशाणा साधताना असले महाभेसळीचे सरकार देशवासीयांना नको आहे, असे मोदींनी सांगितले. भाजपच्या नेतृत्वाखालील पूर्ण बहुमतातले सरकार कशाप्रकारे काम करत आहे, हे देशातील जनता पाहात आहे आणि ते पुन्हा एकदा पूर्ण बहुमतातल सरकार आणतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
काँग्रेसमुळेच बँकिंग क्षेत्रातील अनुत्पादक कर्जे वाढली
काँग्रेस सरकारच्या काळात देण्यात आलेल्या कर्जांवरील व्याजामुळेच आज देशाच्या बँकिंग व्यवस्थेतील अनुत्पादक कर्जाची (एनपीए) रक्कम वाढल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. काँग्रेसने फक्त अवैध संपत्तीविरोधात कायदा आणण्याचा बढाया मारल्या. मात्र, आमच्या सरकारने त्याची अंमलबजावणी केल्यामुळे आज विजय मल्ल्यासारखे उद्योगपती कर्जापेक्षा जास्त रक्कम वसूली केल्याचे सांगत रडत आहेत. हे भाजप सरकारचे मोठे यश आहे.
म्हणून काँग्रेसची राफेल करारावर टीका
मोदी सरकारविरुद्ध विरोधकांचे प्रमुख अस्त्र असलेल्या राफेल खरेदी व्यवहारातील गैरव्यवहाराच्या आक्षेपाला मोदींनी चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय वायूदल सक्षम होऊ नये, असेच काँग्रेसला वाटते. राफेल करारावर टीका करणारी काँग्रेस कोणत्या कंपनीच्या भल्यासाठी काम करत आहे, असा प्रश्न मोदींनी विचारला. काँग्रेसच्या काळात संरक्षण खात्याचा कोणताही व्यवहार दलालीविना पार पडत नव्हता. त्यामुळेच काँग्रेस इतक्या आत्मविश्वासाने राफेल व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत आहे. काँग्रेसच्या कारभारामुळे भारतीय लष्कर निशस्त्र झाल्यासारखे होते. मात्र, आमच्या सरकारने लष्कराला तातडीने सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला. २००९ साली भारतीय लष्कराने १ लाख ८६ बुलेटप्रुफ जॅकेटसची मागणी केली होती. मात्र, २०१४ पर्यंत ही जॅकेटस लष्कराला मिळाली नाहीत. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही लष्कराला तातडीने बुलेटप्रुफ जॅकेटस दिली.
देशातील रोजगार वाढले
काँग्रेस सरकारने गेल्या ५५ वर्षांमध्ये रोजगाराच्या निर्मितीसाठी कोणतीही प्रमाणित व्यवस्था तयार केली नाही. आजच्या काळात रोजगाराची टक्केवारी ठरवताना रोजगाराचे बदलते प्रकार आणि बदललेले निकष ध्यानात घ्यायला हवेत. आमच्या सरकारच्या काळात संघटित क्षेत्रात १.८० कोटी लोकांनी नवीन पीएफची खाती उघडली. हे रोजगार वाढल्याचे लक्षण आहे. तर असंघटित मनुष्यबळाचा विचार करता वाहतूक क्षेत्रात वाहनांची विक्री मोठ्याप्रमाणावर वाढली. मान्यताप्राप्त हॉटेल्सची संख्या ५० टक्क्यांनी वाढली. हे वाढत्या रोजगाराचे लक्षण आहे. पर्यटन क्षेत्रातही दीड कोटी नवे रोजगार निर्माण झाले, असा दावा मोदींनी केला.