तिसरीतल्या मुलीवर सहावीत शिकणाऱ्या मुलांकडून सामूहिक बलात्कार; हत्या केल्यानंतर मृतदेहाला....; पोलीसही चक्रावले

पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी पोलिसांना मुलीच्या मृतदेहाची मुचुमरी येथील सिंचन कालव्यात विल्हेवाट लावल्याची माहिती दिली आहे.  

शिवराज यादव | Updated: Jul 11, 2024, 04:56 PM IST
तिसरीतल्या मुलीवर सहावीत शिकणाऱ्या मुलांकडून सामूहिक बलात्कार; हत्या केल्यानंतर मृतदेहाला....; पोलीसही चक्रावले title=

आंध्रप्रदेशात 8 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे गुन्ह्यातील सर्व आरोपीही अल्पवयीन आहेत. त्यांचं वय 12 आणि 13 आहे. पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी पोलिसांना मुलीच्या मृतदेहाची मुचुमरी येथील सिंचन कालव्यात विल्हेवाट लावल्याची माहिती दिली आहे. आंध्रची राजधानी अमरावतीपासून 300 किमी अंतरावर असलेल्या मुचुमरीमध्ये ही घटना घडली आहे. मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

तिसरीत शिकणारी पीडित मुलगी रविवारपासून बेपत्ता होती. यानंतर तिच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होता. त्यांनी पोलिसांनी सांगितलं होतं की, मुलगी मुचुमरी पार्कमध्ये खेळत होती, पण तिथेून घरी परतलीच नाही. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्यांनी स्थानिकांकडे चौकशी केली. पण त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. 

यानंतर पोलिसांनी स्निफर डॉगची मदत घेतली असता आरोपी मुलांपर्यंत पोहोचले. त्यापैकी दोन इयत्ता 6 वीचे विद्यार्थी आहेत, त्यांचे वय 12 आहे आणि एक 7 वीत शिकत असून 13 वर्षांचा आहे. तिघेही त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत ज्या शाळेत मुलगी होती. चौकशीदरम्यान मुलांनी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी मुलीला उद्यानात खेळताना पाहिले होते आणि तिचासोबत सामील झाले. त्यानंतर त्यांनी तिला मुचुमरी धरणाजवळील निर्जन भागात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीने तिच्या पालकांना याबद्दल सांगितलं तर अडचणीत येऊ शकतो या भीतीने त्यांनी तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह जवळच्या कालव्यात फेकून दिला, असं मुलांनी पोलिसांना सांगितले आहे.

मुचुमरी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक जयशेखर म्हणाले की, आम्ही अद्याप बेपत्ता प्रकरण म्हणून तपास करत आहोत. कारण मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.