नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती मागच्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये आहेत. मेहबुबा मुफ्ती यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊ शकतात. आज सकाळीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीला माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम, राज्यसभेतले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अंबिका सोनी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत काश्मीरमधल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.
जम्मू-काश्मीरमध्ये नुकतंच भाजपनं मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात आलं. ८९ सदस्यांच्या जम्मू-काश्मीर विधानसभेमध्ये काँग्रेसचे १२ आणि पीडीपीचे २८ आमदार आहेत.
मेहबुबा मुफ्तींचं सरकार पडल्यानंतर काँग्रेस पीडीपीच्या मदतीनं सरकार स्थापन करेल, असं बोललं जात होतं. पण पीडीपीसोबत सध्या आणि भविष्यातही युती होणार नसल्याचं तेव्हा गुलाम नबी आझाद म्हणाले होते.
मागच्या १० वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्यांदा राज्यपाल राजवट लागू झाली. या चारही वेळा वोहरा हे राज्यपाल होते. वोहरा जून २००८ साली जम्मू-काश्मीरचे राज्यपाल झाले होते. मागच्या ४० वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे. सध्याच्या विधानसभेचा ६ वर्षांचा कार्यकाळ मार्च २०२१ साली समाप्त होणार आहे.