सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत विरोधकांची बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित

लस पुरवठ्याबाबत केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा बैठकीत उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जींचा आरोप

Updated: Aug 20, 2021, 07:43 PM IST
सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत विरोधकांची बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित title=

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वात आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यासह 19 पक्षांचे नेते उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत देशाची राजकीय परिस्थिती आणि विरोधी पक्षांची भविष्यातील रणनीती यावर चर्चा झाली.

आपलं अंतिम लक्ष्य 2024च्या लोकसभा निवडणुका आहेत,  देशाला स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर, तत्त्वांवर आणि तरतुदींवर विश्वास ठेवणारे सरकार देण्याच्या एकमेव उद्दिष्टासह पद्धतशीर योजना आखण्यास सुरुवात केली पाहिजे असं सांगत सोनीया गांधी यांनी सर्व पक्षांनी भाजपविरोधात एकत्र आलं पाहिजे असं म्हटलं आहे.

या बैठकीत बिगर भाजपशासित राज्यांना कमी लस पुरवठा होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केली. तर सहकार खात्याच्या माध्यमातून मोदी सरकार (Modi Government) राज्यांच्या अधिकारात ढवळाढवळ करत आहे, याकडं शरद पवार यांनी लक्ष वेधलं.

विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे, यासंदर्भात सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे आणि नेतृत्वाचा एक चेहरा देणं गरजेचं आहे अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. नेतृत्वाबद्दल भविष्यात पाहू, पण याक्षणी आम्ही एकत्रित काम करणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यूपीएमध्ये नाहीत, पण यांच्याकडे भविष्यात देशातील आशादायक नेतृत्व म्हणून पाहिलं जातं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.