तीन नावे, 15 गुन्हे अन् 50 हजारांचे बक्षिस... सुरेश रैनाच्या नातेवाईकांची हत्या करणारा राशिद एन्काऊंटरमध्ये ठार

Crime News : राशिद हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडा आदी अनेक गंभीर गुन्हे आहेत. 2020 मध्ये त्याने भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचे मामा आणि कुटुंबातील इतर सदस्यांची एका दरोड्यादरम्यान हत्या केली होती. यानंतर तो इतरही अनेक प्रकरणांमध्ये वाँटेड होता

Updated: Apr 2, 2023, 02:18 PM IST
तीन नावे, 15 गुन्हे अन् 50 हजारांचे बक्षिस... सुरेश रैनाच्या नातेवाईकांची हत्या करणारा राशिद एन्काऊंटरमध्ये ठार title=
(फोटो सौजन्य - ANI)

Crime News : माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी (Police Encounter) ठार केले आहे. उत्तर प्रदेशच्या (UP) मुज्जफरनगर येथे झालेल्या चकमकीमध्ये राशिद याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. सुरेश रैना याच्या नातेवाईकांची हत्या केल्यानंतर आरोपी राशिद हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) रशीद उर्फ ​​सिपाहिया उर्फ ​​चलता फिरता नावाच्या आरोपीला शनिवारी चकमकीत ठार केले आहे. राशिदची त्याच्या परिसरात इतकी दहशत होती की लोक त्याला सिपाही या नावानेही ओळखत होते. पोलिसांनी त्याच्यावर 50 हजारांचे बक्षिस ठेवले होते.

सुरेश रैनाची आत्या आणि तिच्या पतीची हत्या करणाऱ्या राशिदवर 14 ते15 गुन्हे दाखल होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर 50,000 रुपयांचे बक्षीसही ठेवले होते. मुझफ्फरनगरमधील शाहपूर भागात झालेल्या चकमकीत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक रिव्हॉल्वर, देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चकमकीदरम्यान राशिदचा एक साथीदार पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

"कुख्यात गुन्हेगार रशीद उर्फ चलता फिरता उर्फ सिपाहिया, ज्याच्या डोक्यावर 50,000 रुपयांचे रोख बक्षीस होते, तो मुझफ्फरनगरच्या शाहपूर भागात चकमकीत ठार झाला. त्याच्यावर 14-15 गुन्हे दाखल आहेत आणि 2020 मध्ये पंजाबमध्ये क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या 3 नातेवाईकांच्या तिहेरी हत्याकांडातही तो सहभाही होता. चकमकीत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे," अशी माहिती मुझफ्फरनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी दिली.

राशिद मुझफ्फरनगर येथे एका कामासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान पोलिसांनी दोन दुचाकीस्वारांना थांबण्यास सांगितले. मात्र त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तर दिल्यानंतर आरोपींनी शेतात धाव पळ काढला. मात्र चकमकीमध्ये राशिदला गोळी लागली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र त्याचा मृत्यू झाला.

कोण होता राशिद?

राशिद उर्फ ​​सिपाहिया उर्फ ​​चलता फिरता हा मुरादाबादचा रहिवासी होता. तो बावरिया टोळीमध्ये सामील होता. ही टोळी उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या विविध भागांमध्ये सक्रिय होती. या टोळीने आणखीही राज्यात गंभीर गुन्हे केले होते. दरोड्याच्या वेळी ही टोळी लोकांची निर्घृण हत्याही करत होती. राशिदवर  खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, दरोडा अशा गुन्ह्यांची नोंद होती. रैनाच्या नातेवाईकांच्या हत्येप्रकरणीही तो वॉन्टेड होता.