'मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहणार'

मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचं गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केलंय.

Updated: Sep 16, 2018, 05:43 PM IST
'मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहणार' title=

दिनेश दुखंडे, प्रतिनधी, झी मीडिया, पणजी : मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचं गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे गोव्यातल्या नेतृत्व बदलाच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय. तसंच इतर मंत्रीही स्वत:च्या खात्याचा कारभार पाहण्यास सक्षम असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

भाजपचे नेते गोव्यात

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना एम्समध्ये दाखल केल्यामुळे गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला होता. तसंच नेतृत्व बदलाचीही चर्चा रंगली होती. गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते रामलाल, संघटन मंत्री विजय पुराणिक, गोव्यात आले आहेत. त्यांच्यासोबतच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकरांनी नेतृत्व बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे निरीक्षकांनी भाजपच्या आमदारांची मतं जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवाद सुरू केलाय.

'मगोप'लाही हवेत पर्रिकर

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी कायम रहावेत असं मत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केलय. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करण्याचा आनंद असून त्यांचं नेतृत्व आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलय. तर पर्रिकर मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत या सरकारला पाठिंबा आहे अशी भूमिका महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केलीय.