मोदींना नीच म्हटले ते योग्यच होते; मणिशंकर अय्यर पुन्हा वादात

देशाच्या सर्वात बोलघेवड्या पंतप्रधानाचा हा सर्वोत्तम अंत ठरेल.

Updated: May 14, 2019, 05:29 PM IST
मोदींना नीच म्हटले ते योग्यच होते; मणिशंकर अय्यर पुन्हा वादात title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'नीच' संबोधणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. आपण या वक्तव्यावर अजूनही ठाम असल्याचे अय्यर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता हा वाद नव्याने उकरला गेला आहे. २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी मणिशंकर अय्यर यांनी मोदींना 'नीच' म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. काँग्रेस पक्षाने अय्यर यांच्यावर निलंबनाची कारवाईही केली होती. यानंतर हा वाद शमला होता. परंतु, आता मणिशंकर अय्यर यांनी नुकत्याच लिहलेल्या एका लेखात या वक्तव्याचे समर्थन केले. नरेंद्र मोदी यांची अलीकडची वक्तव्ये पाहता मी त्यांच्याबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली ना?, असा सवाल अय्यर यांनी उपस्थित केला. 

राजीव गांधी यांनी विराट युद्धनौकेचा वापर टॅक्सीप्रमाणे केल्याचा, पुराणकाळात प्लॅस्टिक सर्जरीचे तंत्रज्ञान अस्तित्वात असल्याच्या मोदींच्या विधानांचा दाखला अय्यर यांनी या लेखात दिला आहे. येत्या २३ तारखेला मोदींचा पराभव होईल. जनता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवेल. हा देशाच्या सर्वात बोलघेवड्या पंतप्रधानाचा सर्वोत्तम अंत ठरेल, असेही अय्यर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मंगळवारी अय्यर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षांना आपण हारणार असल्याची जाणीव होऊ लागली आहे. त्यांच्या रागाचा कडेलोट झाला आहे. त्यामुळे ते स्वत:च्या समाधानासाठी अशाप्रकारे शेलक्या शब्दांत टीका करत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

तत्पूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनीही सोमवारी नरेंद्र मोदींबाबत एक आक्षेपार्ह विधान केले. आगामी निवडणुकीत काँग्रेसला ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत तर नरेंद्र मोदी चौकात गळफास लावून घेतील का? असा प्रश्न खरगे यांनी विचारला होता.