नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि 'श्रमिक ट्रेनची' 'कोरोना एक्स्प्रेस' म्हणून हेटाळणी करणे, या दोन कारणांमुळे पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव होईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ते मंगळवारी भाजपच्या जनसंवाद रॅलीत बोलत होते.
यावेळी त्यांनी केंद्राच्या धोरणांना विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी शाह यांनी म्हटले की, नागरिकत्व सुधारणा कायदा हा लांगुलचालनाच्या राजकारणामुळे वर्षानुवर्षे छळ होत असलेल्या अल्पसंख्याक समाजाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या निर्वासितांनी ममतांचे काय बिघडवले आहे? येत्या विधानसभा निवडणुकीत मतपेट्या उघडतील तेव्हा जनता तुम्हाला राजकीय शरणार्थी बनवेल. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणे तुम्हाला महागात पडेल, असा इशारा अमित शाह यांनी दिला.
यावेळी शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान सन्मान निधी आणि आयुषमान भारत या केंद्र सरकारच्या योजना लागू न करण्यावरूनही ममतांवर टीकास्त्र सोडले. ममतांच्या सरकारमुळे बंगालमधील सामान्य लोकांना या योजनांचा लाभ मिळत नाही. बंगालमधील वयोवृद्ध नागरिकांना स्वत:वर उपचार करुन घेण्याचा अधिकार नाही का? तसेच आम्हाला बंगालच्या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधीचे पैसे द्यायचे आहेत. मात्र, केवळ ममतांमुळे ते शक्य होत नाही. राजकारण करण्याला मर्यादा असतात आणि तुम्ही आमच्यावरच उलटे आरोप करता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आपल्या राज्यात आयुष्मान भारत योजना लागू करायला परवानगी दिली. आपल्याला लढण्यासाठी इतर अनेक मुद्दे आहेत. मात्र, सामान्य जनतेला या सगळ्यापासून दूर ठेवा, अशी विनंती अमित शहा यांनी ममता बॅनर्जींना केली.