President Muizzu visit to India: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मालदीवच्या मंत्र्यांनी सोशल मीडियावरुन केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर भारत विरुद्ध मालदीव असा संघर्ष सुरु झाला आहे. मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानावर भारताने तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केल्यानंतर मालदीवचे डोळे उघडलेत. आता मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी याच महिन्याच्या अखेरीला भारत दौरा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
नोव्हेंबरमध्ये सत्तेत आल्यावर मुइझ्झू यांनी तुर्की, संयुक्त अरब अमिरात, आणि चीन या दोन देशांना यापूर्वी भेटी दिल्या आहेत. आतापर्यंतच्या परंपरेनुसार मालदीवमध्ये ज्याची सत्ता येते त्याचा पहिला परदेश दौरा भारतात असतो. पण मुइझ्झू यांनी ही परंपरा मोडीत काढली आहे. भारताबरोबर ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लक्ष्यद्वीप दौऱ्याचे फोटो ट्विट केले होते. त्यापाठोपाठ मालदीवमधील मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात गरळ ओकली आणि त्यानंतर भारतानेही कडक पवित्रा घेत मालदीवला खडसावलं. लगेचच मालदीवच्या त्या मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र हा सारा गोंधळ होण्याआधीच मुइझ्झू यांचा दौरा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात करण्याचा मालदीव सरकारचा मानस त्यांनी बोलून दाखवला होता. मात्र आता भारत याला परवानगी देणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मात्र पंतप्रधान मोदींबरोबरच भारतीयांबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भारतीयांनी मालदीववर बहिष्कारास्त्र टाकलं आहे. गेल्या 48 तासात जवळपास 10 हजार भारतीयांनी आपले मालदीव दौरे रद्द केले आहेत. त्यामुळे धाबं दणाणलेल्या मालदीवने लगेचच त्यांचे राष्ट्रपती मुईझ यांच्या भारत दौऱ्याचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती पुढे आली आहे.
मुइझ्झू यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला होता. भारतीय जवानांची पाठवणी करण्याच्या आश्वासनावर मतदारांनी आपल्याला कौल दिला असल्याचे मुइझ्झू यांनी सांगितले. 17 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांनी मालदीवचे आठवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यांनी मालदीवचे आठवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. या शपथविधीला भारताचे भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते.
शपथविधीनंतर 24 तासांच्या आत, 18 नोव्हेंबर रोजी रिजिजू यांच्याशी झालेल्या भेटीत मुइझ्झू यांनी लष्कर परत बोलाविण्याची औपचारिक विनंती करून भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाला धक्का दिला. मालदीवचे माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांचे मुइझ्झू हे निकटचे सहकारी आहेत. यामीन यांनीच 2013 ते 2018 या काळात चीनबरोबर संबंध अधिक दृढ केले असल्याने मुइझ्झूदेखील त्याच वाटेने जाणारे नेते मानले जातात. मालदिव हा हिंदी महासागर प्रदेशातील मोक्याचे ठिकाण असलेला भारताचा प्रमुख सागरी शेजारी देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सागरमाला’ आणि ‘नेबरहूड फस्र्ट पॉलिसी’ या संकल्पनेमध्ये मालदीवला विशेष स्थान देण्यात आले आहे. असं असतानाही मालदीवने विरोधी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.