हॉटेलला भीषण आग, १७ जणांचा मृत्यू

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल 

Updated: Feb 12, 2019, 10:15 AM IST
हॉटेलला भीषण आग, १७ जणांचा मृत्यू title=

नवी दिल्ली : दिल्लीतील करोल बाग येथे असणाऱ्या अर्पित पॅलेस या हॉटेलला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली असून, या आगीत होरपळून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवळपास २५ गाड्या दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

अतिशय भीषण स्वरुपाच्या या घटनेमध्ये आतापर्यं १७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अग्निशमन दलाकडून बचावकार्य वेगाने सुरु असून, हॉटेलमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. एकिकडे बचाव कार्यास वेग आलेला असतानाच आग लागण्यामागचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. 

मंगळवारी सकाळी  लागलेल्या या आगीतून जीव वाचवण्यासाठी हॉटेलमध्ये असणाऱ्यांनी जीवाच्या आकांताने प्रयत्न करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हॉटेलच्या आतल्या भागातून आगीच्या झळा बाहेर येताना दिसल्या, ज्यानंतर पाहता पाहता आग झपाट्याने वाढत गेली. क्षणार्धातच हॉटेलमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होऊन काहींनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलमधून खाली उड्या मारल्या. यामध्ये काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अर्पित हॉटेलला लागलेल्या या आगीतून आतापर्यंत २५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.