प्रियांका गांधींकडे जादूची छडी नाही- प्रशांत किशोर

प्रियांका यांचा आगामी लोकसभा निवडणुकांवर फारसा परिणाम होणार नाही

Updated: Feb 12, 2019, 07:42 AM IST
प्रियांका गांधींकडे जादूची छडी नाही- प्रशांत किशोर  title=

पाटणा : जेडीयू नेते आणि राजकीय रणनिती आखण्यासाठी ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांच्या आगामी राजकीय कारकिर्दीविषयी वक्तव्य केलं आहे. काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झालेल्या आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचा भार आपल्या खांद्यांवर घेतलेल्या प्रियांका यांचा आगामी लोकसभा निवडणुकांवर फारसा परिणाम होणार नाही, अशी भविष्यवाणी किशोर यांनी केली. 

'कोणाकडेच जादूची छडी नाही. निवडणुकांसाठी आता अवघे दोन- तीन महिने उरलेले असताना त्या (प्रियांका) काँग्रेससाठी फार गोष्टी बदलू शकतील असं मला वाटत नाही. सक्षम नसल्यामुळे त्या अपयशी ठरती असं नाही. पण, इतक्या कमी वेळात फार गोष्टी बदलता येत नाहीत', असं किशोर म्हणाले. जेडीयुत प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेसशी जोडले गेलेले किशोर हे 'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी बोलत होते. 

प्रियांका गांधी वाड्रा या निवडणुकांमध्ये फार चांगली कामगिरी करू शकणार नाहीत असं भाकीत करत असतानाच त्या इतर पक्षांसाठी एक तगडं आव्हान म्हणून समोर येण्याची शक्यता असणार आहेत ही वस्तुस्थितीसुद्धा त्यांनी न विसरता मांडली. 

बऱ्याच वर्षांपासून प्रियांका गांधी या राहुल गांधी यांच्या रोड शो किंवा प्रचार रॅलीमध्ये दिसत होत्या. अखेर काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या महाचसचिव पदाची धुरा सोपवण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची स्थिती भक्कम करण्यासाठी उचलण्यात आलेली ही पावलं आता पक्षाला कितपत फायद्याची ठरणार ये काळच ठरवणार आहे. पण, तरीही प्रियांका खऱ्या अर्थाने राजकारणाच्या पटलावर सक्रिय झाल्या असल्याचं पाहून विरोधी पक्षांमध्ये त्यांच्याकडे एक मोठं आव्हान म्हणून पाहण्यास सुरुवात झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

मुख्य म्हणजे आपल्या पदाची जबाबदारी जाणत प्रियांका यांनी उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथून रोड शोच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरु केले.  आता येत्या काळात त्या नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभा निवडणुका हेच प्रियांका गांधी यांचं राजकारणात येण्याचं एकमेव लक्ष्य नसून निवडणुकांसोबतच ते उत्तर प्रदेशात काँग्रेसला आणखी भक्कम करण्यावर भर देतील ही बाब रोड शोदरम्यान खुद्द काँग्रेस अक्ष्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केली.

दरम्यान प्रियांकांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या पाच दिवसीय दौऱ्यात त्या बऱ्याच मतदार संघांचा आढावा घेणार आहेत. त्याशिवाय पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेटही घेणार आहेत.