Maharashtra - Karnataka Border Dispute :अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटण्याची शक्यता आहे. ( Maharashtra - Karnataka Border Issue ) दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झालेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघणार का, याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत असतील. संध्याकाळी 7.30 वाजता नवी दिल्लीत ही बैठक होईल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे.
अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या बैठकीआधी बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीकडून बोम्मई यांना पत्र लिहण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत बेळगाव आणि इतर परिसर महाराष्ट्राला देण्याबाबत तडजोड करु नये, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे.दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर राज्याची भूमिका स्पष्ट करणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी केला . बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.
राज्य पुनर्रचना कायद्यापासून घडलेल्या सर्व घडामोडी, प्रकरण आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या वादाबद्दलची याचिका मी सामायिक करेन, असे बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले. ते पुढे म्हणाले, अमित शाह यांना राज्य पुनर्रचना कायदा आणि प्रलंबित प्रकरणाबाबत तपशील आधीच दिला आहे. ते म्हणाले, आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांना कळवू की सर्वोच्च न्यायालयाने 2004 पासून असे कोणतेही प्रकरण घेतलेले नाही.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पणतू आणि महाराष्ट्रातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी बेळगावला अचानक गनीमी काव्याने भेट दिली. त्यामुळे जे महाराष्ट्रातील मंत्र्यांना जमले नाही, ते त्यांनी करुन दाखवले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण महाराष्ट्राचे मंत्री बेळागावला भेट देणार होते. त्यांना विरोध झाल्यानंतर त्यांनी जाणे टाळले होते.