नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापना करण्यासाठी शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या 'महाविकास आघाडी'चा सत्ता फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या नव्या फॉर्म्युल्यानुसार, मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाल्याचं समजतंय. तर १६ : १५ : १२ या फॉर्म्युल्यावरही आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झाल्याचं समजतंय. या नव्या फॉर्म्युल्यानुसार, विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतं. तसंच महामंडळांचीही विभागणी शिवसेना : २७, राष्ट्रवादी काँग्रेस : २५, काँग्रेस : २५ अशी करण्यात आल्याचं समजतंय. यातील, सिद्धिविनायक ट्रस्ट : शिवसेना तर शिर्डी देवस्थान : काँग्रेस-राष्ट्रवादीकडे राहील. शरद पवार - उद्धव ठाकरे यांच्या गुरुवारी रात्री झालेल्या भेटीत या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय.
शिवसेना : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, ११ कॅबिनेट, ५ राज्यमंत्रिपदं
राष्ट्रवादी : उपमुख्यमंत्रीपद, ११ कॅबिनेट, ४ राज्यमंत्री पदं
काँग्रेस : उपमुख्यमंत्रीपद, ९ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रीपदं
या पार्श्वभूमीवर आज मुंबईत बैठकांचा धडाकाच दिसणार आहे. आज दुपारी आघाडीच्या मित्रपक्षांची दुपारी बैठक पार पडणार आहे. दुपारनंतर तीनही पक्षांची बैठक होण्याची शक्यता आहे.
तसंच काँग्रेसचा विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठीही आज एक बैठक पार पडणार आहे. या स्पर्धेत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांची नावं आघाडीवर आहेत.
महाविकासआघाडीकडून आजच सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. २६ नोव्हेंबरला संविधान दिनाचा मुहूर्त साधत शपथविधी व्हावा, अशी काँग्रेसची मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे आजच महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.
राज्याच्या सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. महाविकासआघाडीसाठी रात्रीही खलबतं सुरु होती.. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली. ही भेट सकारात्मक झाल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले.