Lotus Cultivation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. अयोध्येत रामलल्लाच्या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी रामलल्लाच्या पूजेसाठी पंतप्रधान मोदी यांच्या हातात कमळाची फूल होती. कमळाच्या फुलांचे पुजेच्या विधीमध्ये खास महत्त्व आहे. ही फुलं जितकी सुंदर आहेत तितकेच त्यांचे धार्मिक महत्त्वही आहे. देशात वर्षभरात अनेक धार्मिक उत्सव व कार्यक्रम असतात. तसंच, भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीलाही कमळ हे पु्ष्प प्रिय आहे. त्यामुळं कमळाच्या फुलांची मागणी सतत वाढतच असते. हीच सांधी साधून तुम्ही कमळाच्या फुलांची शेती करु शकता. या शेतीतून तुम्ही लाखो रुपये कमावू शकता.
कमळाच्या शेतीमुळं तुम्ही 8 पट नफा मिळवू शकता. कमळाच्या शेतीसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलाव. पण आजच्या काळात आधुनिक शेती करताना अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. तुम्ही समतल जमीनीवरही ही शेती करु शकता. तसंच, या शेतीसाठी जास्त रक्कम खर्च करण्याची गरजच नसते. कमी रक्कम खर्च करुनही तुम्ही 8 पट नफा मिळवू शकता.
जर तुमच्याकडे तलाव आहे तर खूपच चांगली गोष्ट आहे. जरी तुमच्याकडे तलाव नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही शेतातच कमळाची लागवड करण्यास सुरुवात करु शकता. त्यासाठी सर्वात आधी शेतातील माती नांगरुन भुसभुशीत करुन घ्या. त्यानंतर जमीन समतोल करुन घ्या त्यानंतर यावर कमळाच्या बियांची लागवड करा. बियांची लागवड केल्यानंतर शेतात 2 महिन्यांपर्यंत सतत पाणी साठवून ठेवायचे आहे. जेणेकरुन ओलावा आणि चिखल तयार होईल. ज्यामुळं कमळाची रोपं फुलतील.
कमळाचे फूल पूर्णपणे तयार व्हायला 5 महिन्यांचा वेळ लागतो. या हिशोबाने तुम्ही वर्षभरात दोनदा कमळाच्या फुलांची शेती करु शकता. जर तुम्ही जून महिन्यात लागवड करत असाल तर ऑक्टोबरपर्यंत शेती तयार होईल. यापद्धतीने तुम्ही डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा लागवड करु शकता व मेमध्ये फूल तोडू शकता.
एका एकरमध्ये कमळाची शेती केल्यास जवळपास 5 ते 6 हजार रोपं लागतील. यासाठी जवळपास 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च येईल. कारण पाणी आणि बिया याव्यतिरिक्त अन्य कोणता खर्च येणार नाही. फूल तयार झाल्यानंतर आरामात बाजारात विक्रीसाठी भाव मिळतो. एका एकरमधून साधारण 2 लाख रुपयांचा नफा मिळतो. याचाच अर्थ 25 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्हाला 2 लाखापर्यंतचा फायदा होता. तुम्हाला अधिक फायदाही मिळू शकतो. ज्या शेतीत कमळाची लागवड करणार आहात त्याच शेतीत शिंगाडा आणि मखाणाचे पिक घेऊ शकतात. ज्यामुळं तुम्हाला अधिक उत्पन्न मिळेल.