नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत. ११ एप्रिल, १८ एप्रिल, २३ एप्रिल, २९ एप्रिल, ६ मे, १२ मे आणि १९ मे या ७ टप्प्यांमध्ये देशभरात निवडणुका होतील. तर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील.
लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच देशात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र इतिहासात पहिल्यांदाच समाज माध्यमांवरही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. समाज माध्यमांवर जाहिरातींची निवडणूक आयोग पडताळणी करणार आहे. समाज माध्यमांमध्ये जाहिरात पोस्ट करताना राजकीय पक्षांना याबाबत निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे.
गुगल आणि फेसबुकलाही जाहिराती ओळखून याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय खोट्या बातम्या आणि तणाव निर्माण करणाऱ्या भाषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाज माध्यम स्तरावर अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहितीही आयोगाने दिली आहे.
सर्वसामान्य जनता आणि राजकीय पक्षांसाठी काही मोबाईल अॅप्स आणि डिजिटल पोर्टल्सची माहितीही यावेळी देण्यात आली. आचारसंहिता भंग होत असल्याचं निदर्शनास आल्यास ती घटना रेकॉर्ड करून आयोगाने तयार केलेल्या अॅपवर पाठवावी आणि तक्रारदाराचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, असंही निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. दिव्यांगासाठीही विशेष अॅप लॉन्च करण्यात आल्याची माहिती आयोगानं दिली.