वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२६ एप्रिल) आपल्या मतदारसंघातून अर्थात वाराणसीमधून लोकसभा निवडणूक २०१९ साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधानांनी शुक्रवारी ११.३० वाजता वाराणसी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान मोदींनी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाराणसीच्या पंडितांनी शुभ मुहूर्त काढला होता. यानुसार, दिवस, तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली. कार्य सिद्धिस नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभ 'अभिजीत मुहूर्ता'वर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
#WATCH: PM Narendra Modi files nomination from Varanasi parliamentary constituency. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/ym9x2gCYYG
— ANI UP (@ANINewsUP) April 26, 2019
मोदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वाराणसीतल्या काळभैरव मंदिरात पूजेसाठी दाखल झाले. इथं त्यांनी मंदिरात पूजा-अर्चना केली. यानंतर दते वाराणसीच्या गल्ल्यांमधून लोकांच्या भेटी घेत घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले.
पंतप्रधान दोन दिवस वाराणसीतच असणार आहेत. दोन दिवस मोदींचे शहरात भरगच्च कार्यक्रम आहेत. पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत भाजपाचे वरिष्ठ नेत्यांसोबत एनडीएचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. भाजप नेत्या सुषमा स्वराज, भाजपाध्यक्ष अमित शहा हेदेखील पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहिलेत. त्याचसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवानही उपस्थित आहेत.
आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत सकाळी बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझा बूथ सर्वात मजबूत हा संदेश देतानाच महिलांचं मतदान ५ टक्क्याने अधिक व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षांचा प्रत्येक उमेदवार हा आदरणीय आहे, त्यांच्याशी वैर नाही, बंधुभाव बाळगा असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मला शिव्या देणाऱ्यांची पर्वा करत नाही, शिव्यांच्या चिखलातून कमळ फुलवतो असं मोदी यावेळी म्हणाले.
यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावकांच्या नावांच्या यादीत सात नावांचा समावेश आहे. यामध्ये ठुमरी गायिका आणि उस्ताद बस्मिल्लाह खाँ यांची मानद मुलगी पद्मश्री सीमा घोष यांच्या नावाचाही समावेश असल्याचं सांगितलं जातं. ही यादी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आलीय. यामध्ये एक डोमराजा कुटुंबातील सदस्यांसोबत एक चौकीदार, संघाशी निगडीत एक वरिष्ठ नेते आणि एका महिलेच्या नावाचा प्रस्ताव आहे.