लोकसभा निवडणूक 2019 : मतदारांना घाबरवण्यासाठी बॉम्बहल्ला

या मतदानाला हिंसेचे गालबोट लागल्याच्या घटना समोर येत आहेत. 

Updated: May 19, 2019, 01:31 PM IST
लोकसभा निवडणूक 2019 : मतदारांना घाबरवण्यासाठी बॉम्बहल्ला title=

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2019 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. याअंतर्गत 59 जागांवर आज मतदान होत आहे. 8 राज्यातील साधारण 10.17 कोटी मतदार या टप्प्यातील 918 उमेदवारांचे भाग्य ठरवणार आहे. दरम्यान या मतदानाला हिंसेचे गालबोट लागल्याच्या घटना समोर येत आहेत. मथुरापूरमधील सतपुकार भागात अज्ञातांनी मतदारांना घाबरवण्यासाठी बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. हा बॉम्ब रस्त्यावर फुटल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 

पश्चिम बंगालच्या देगंगा नूरनगर पंचायत क्षेत्रातील 90 आणि 91 नंबर पोलिंग बुथवर भाजपा कार्यकर्ता शिबू घोषच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. टीएमसी कार्यकर्त्यांवर या हल्ल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. घोषला उपचारासाठी बारासात येथे नेण्यात आले आहे. तर डायमंड हार्बरचे भाजपा उमेदार नीलांजन रॉय यांच्या कारवर देखील हल्ला झाला असून कारच्या काचा तोडण्यात आल्या आहेत. दमदम येथे भाजपा पोलिंग एजंटवर हल्ला करण्यात आला. तर आसनसोलमध्ये भाजपा उमेदवार बाबुल सुप्रियो सोबत टीएमसी कार्यकर्त्यांची मारामारी झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी आज सकाळी मतदान केलं. पंतप्रधान मोदींवर बॅनर्जी यांनी जोरदार निशाणा साधला. पंतप्रधानांची देहबोली पाहा, यावेळी बहुमत मिळणार नाही असं लक्षात आल्यानेच ते ध्यानधारणेसाठी गेले अशी टीका त्यांनी केलीय. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस ४२ पैकी ४२ जागा पटकावेल असं ते म्हणाले. 

कोलकात्यात ९ मतदारसंघात आज मतदान सुरू आहे. सीपीएमचे खासदार मोहम्मद सलीम यांनी आज सकाळी मतदान केलं. मतदानानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर तुफान आरोप केले. तृणमूलचे कार्यकर्ते गुंडगिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. प्रत्येक बूथवर तृणमूल दादागिरी करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. केंद्र सरकारची निमलष्करी दलं तैनात आहेत तरीही सररास पैसे वाटप सुरू आहे असं ते म्हणाले. ममता बॅनर्जी ४२ काय ४२० जागा मिळतील असा दावाही करू शकतात असं ते म्हणाले.