लॉकडाऊन संदर्भात कोणत्या राज्याचा काय प्लान? जाणून घ्या

 काही शहरात लॉकडाउन लागू करण्यात आलाय

Updated: Apr 13, 2021, 05:02 PM IST
लॉकडाऊन संदर्भात कोणत्या राज्याचा काय प्लान? जाणून घ्या title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज रेकॉर्डब्रेक प्रकरणे दाखल होत आहेत. काही राज्यात परिस्थिती अधिक बिकट आहे. त्या राज्यातील सरकार त्यांच्या पातळीवर कठोर निर्बंध लागू करत आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण लॉकडाउनची चर्चा जोरात सुरू आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मध्ये काही शहरात लॉकडाउन लागू करण्यात आलाय. दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यात नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्यात आला आहे.

सध्या उत्तर प्रदेशात लॉकडाउन (Lockdown) नाही. वाढत्या संक्रमणामुळे लॉकडाउनची चर्चा जोरात सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनी स्पष्ट केले की, सध्या लॉकडाऊन करण्याचा कोणताही हेतू नाही.

पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार नसल्याचे दिल्ली सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारली आहे. तरी रात्री कर्फ्यूसह सर्व निर्बंध लागू आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज सांगितले की, सध्या लॉकडाऊनचा विचार नाही. 'आता आम्ही रात्रीचा कर्फ्यू लागू केलाय. आणि परिस्थिती आणखी बिकट झाल्यास आम्ही पंतप्रधानांशी चर्चा करून निर्णय घेऊ'. एका आठवड्यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल, त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले.

कोरोना संसर्गामुळे मध्य प्रदेशात हाहाकार माजलाय आहे. सोमवारी राजधानी भोपाळमध्ये गेल्या एक वर्षाचा विक्रम मोडला गेला. पहिल्यांदाच एका दिवसात 1456 रुग्ण आढळले आहेत. यानंतर सरकारने 19 एप्रिलपर्यंत भोपाळमध्ये कोरोना कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत आजच निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी झी 24 तासशी बोलताना यासंदर्भात  संकेत दिले आहेत. लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली. टास्क फोर्सशी आणि व्यापाऱ्यांशी देखील चर्चा केल्याचे ते म्हणाले. 
आपल्याकडे रुग्ण जास्त आहेत. आपण मुंबईत ४ नवीन कोविड सेंटर सुरू करतोय. साखळी तोडायचा दोन आठवड्यापासून आम्ही प्रयत्न करतोय. 
त्यामुळे आज मोठा निर्णय होऊ शकतो असे अस्लम शेख म्हणाले. 

छत्तीसगडमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात पसरतोय.  राजधानी रायपूरमध्ये आणखी वाईट परिस्थिती आहे. शुक्रवारीच 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढती घटना लक्षात घेता बाहेरून येणाऱ्या लोकांना आरटी-पीसीआर चाचणीचे निगेटीव्ह अहवाल आणणे बंधनकारक आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची चौकशी केली जात आहे.

पंजाब आणि हरियाणामधील बर्‍याच भागात नाईट कर्फ्यू आहे. चंदीगडमध्ये कोविड संसर्ग सतत वाढत आहे. इथे लॉकडाउनची चर्चा आहे. चंदीगडचे प्रशासकीय सल्लागार मनोज परीदा म्हणाले, “जर परिस्थिती अत्यंत गंभीर असेल आणि कोरोना प्रकरणे वाढत गेली तर लॉकडाउनकडे दुर्लक्ष करता येणार नाही.