नवी दिल्ली : राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राहुल गांधी वगळता कोणत्याच काँग्रेस नेत्यानं अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाही. त्यामुळे राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्ष व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे.
राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर गांधी-नेहरु परिवारातील ते काँग्रेसचे सहावे अध्यक्ष असतील. याआधी मोतीलाल नेहरु, जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद भुषवलं आहे.
सगळ्यात पहिले गांधी-नेहरु परिवारातील मोतीलाल नेहरु 1928 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर लगेचच म्हणजे पुढच्या वर्षी 1929-30 मध्ये जवाहरलाल नेहरु काँग्रेस अध्यक्ष झाले. मग 1936-37 आणि 1951 ते 1954 पर्यंत नेहरु पुन्हा काँग्रेस अध्यक्ष राहिले.
1959 मध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदाच काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर 1978 ते 1984पर्यंत इंदिरा गांधीच काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या.
इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा आली. 1985-1991 या काळामध्ये राजीव गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते.
राजीव गांधी यांची पत्नी सोनिया गांधी यांच्याकडे 1998मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी आली. 1998 ते 2017 अशी 17 वर्ष सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत.