अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात कर्नाटकातील (karnataka) चित्रदुर्ग येथील लिंगायत मठाचे प्रमुख संत शिवमूर्ती मुरुघा शरनारू (Shivamurthy Muruga) यांना पोलिसांनी अटक केली आहे संत शिवमूर्ती यांच्यावर मठ संचलित संस्थेतील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मठातील दोन अल्पवयीन मुलांनी दिलेल्या तक्रारीनंतर म्हैसूर शहर पोलिसांनी शिवमूर्ती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. त्यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शरनारूर यांच्या अटकेच्या काही तास आधी, कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी त्यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली होती. शिवमूर्ती मुरुघा शरनारू हे कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील लिंगायत मठाचे मुख्य महंत आहेत. महंतांच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यात निदर्शनेही होत होती, त्यानंतर पोलिसांवर दबाव वाढला होता.
चित्रदुर्ग येथील स्थानिक न्यायालयाने गुरुवारी मठाचे प्रमुख महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. वकिलांच्या एका गटाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला पत्र लिहून असा दावा केला आहे की चित्रदुर्गातील मुरुगा मठाचे शिवमूर्ती मुरुगा स्वामी यांच्या विरोधात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास निष्ट आणि स्वतंत्र पद्धतीने चालवला गेलेला नाही.
मठाचे प्रशासकीय अधिकारी एस. के. बसवराजन यांनी गुरुवारी सांगितले की ते महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांच्या विरोधात कोणत्याही कटात सामील नव्हते आणि मुलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करून त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. मठ अधिकाऱ्यांनी माजी आमदार बसवराजन आणि त्यांच्या पत्नीवर महंतांविरोधात कट रचल्याचा आरोप केला होता.
मठामार्फत चालवल्या जाणार्या शाळेत शिकणार्या दोन मुलींनी म्हैसूरमधील ओदानदी सेवा संस्थान या एनजीओशी संपर्क साधला होता. मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार वसतिगृहात राहणाऱ्या दोन मुलींचे साडेतीन वर्षांपासून लैंगिक शोषण करण्यात येत होते. मठप्रमुख संस्थेत शिकणाऱ्या इतर अनेक विद्यार्थिनींना त्रास देत असल्याचा आरोप ओदानदी सेवा संस्था या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख स्टेनली यांनी केला.