मुंबई : शेअर बाजारात नायकाला मिळालेल्या धमाकेदार लिस्टींगसोबतच फाल्गुनी नायर यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. हे एका असामान्य महिलेचं नाव आहे, ज्यांनी व्यवसाय क्षेत्रात किमया करत अनेक बड्या व्यावसायिकांना गारद केलं आहे.
ब्यूटी स्टार्टअप ब्रँड Nykaa च्या संस्थापिका फाल्गुनी नायर ह्या भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश महिला ठरल्या आहेत. यशस्वी होण्याची एक नवी कहाणी त्यांच्या नावे लिहिली गेली आहे.
आपल्याला मिळालेलं हे यश म्हणजे एक मोठं स्वप्न साकार होण्यासारखंच आहे, असंच खुद्द फाल्गुनी सांगतात. 'मी 50 वर्षांच्या वयात कोणत्याही अनुभवाशिवाय नायकाची सुरुवात केली. मला आशा आहे की, नायकाची कहाणी तुम्हाला प्रत्येकालाच जीवनात नायक किंवा नायिका होण्यासाठी प्रेरित करत आहे', असं त्या म्हणाल्या.
ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या नव्या आकड्यांनुसार बुधवारी नायकाच्या धमाकेदार लिस्टींगसह मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांच्याही पलीकडे गेला आहे. जवळपास 80 टक्के प्रिमीयरवर नायकाची लिस्टींग झाली.
लिस्टीनंगनंतर शेअरची किंमत 2248 वर पोहोचली आणि अखेर 2208 वर बंद झाला. आयपीओच्या माध्यमातून मिळालेले पैसे देशात आणखी काही स्टोअर्स सुरु करण्यावर खर्चणार आहे.
अशी होती यशोगाथा ...
Nykaa ची मोठी भागीदारी असणाऱ्या फाल्गुनी नायर यांच्या नावाची. नायका या कंपनीच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी आली असून, याचं नेट वर्थ 6.5 बिलियन डॉलरच्याही पलीकडे गेलं आहे.
FSN ई कॉमर्स वेंचर्स ही नायकाची पँरेंट कंपनी आहे. शिवाय स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला नेतृत्त्व असणारी कंपनी ठरली आहे.
इन्वेस्टमेंट बँकर असणाऱ्या फाल्गुनी नायर यांनी 2012 मध्ये या कंपनीची सुरुवात केली होती. 1600 हून अधिक सहकाऱ्यांच्या टीमचं नेतृत्त्वं करत फाल्गुनी यांनी हे साम्राज्य उभं केलं. सध्याच्या घडीला नायका हा भारतातील आघाडीच्या सौंदर्य प्रसाधनांच्या ब्रँडपैकी एक आहे.
IIM अहमदाबादमधून शिक्षण घेत नायर यांनी एएफ फर्ग्युसन अँड कंपनीपासून करिअरची सुरुवात केली. त्यांनी कोटक महिंद्रा बँकेत 18 वर्षे काम केलं. कोटक महिंद्रा बँकेत त्या इन्वेस्टमेंट बँक खात्यात प्रबंध संचालक खात्यात कार्यरत होत्या. कोटक सिक्योरिटीजमध्येही त्यांनी सर्वोच्च हुद्द्यावरही काम पाहिलं होतं.
2014 मध्ये नायकाच्या पहिल्या फिजिकल स्टोअरची सुरुवात झाली. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत FSN ई कॉमर्सकडे देशभरात 80 स्टोअर्स नमूद आहेत. नायकाचा एक अॅपही आहे. याशिवाय Nykaa Fashion ब्रँडही आहे. जिथं कपडे, अॅक्सेसरीज इत्यादी प्रॉडक्ट्स विकले जातात. या अॅपवर 4 हजारहून अधिक ब्यूटी आणि पर्सनल केअर ब्रँड आहेत.