सीतापूर : उत्तर प्रदेशमधल्या लखीमपुर खेरी हिंसाचारानंतर (Lakhimpur Kheri Violence) राजकीय वातावरण तापलं आहे. सीतापूरमध्ये पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेल्य काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना शांतता भंग आणि जमावबंदीच्या कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे. (Priyanka Gandhi Arrested).
प्रियंका गांधी (Priyanka Gandhi)यांच्यावर आयपीसी 151, 107, 116 कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखीमपूर हिंसाचारातील (Lakhimpur Kheri)पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना काल प्रियंका गांधी
यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर तब्बल 30 तासांनंतर प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांना काल ठेवण्यात आलेल्या गेस्ट हाऊसमध्ये तात्पुरत्या स्वरुपात जेल उभारण्यात आलं असून त्यात प्रियंका गांधी यांना ठेवण्यात आलं आहे.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत काही प्रश्न विचारले आहेत. या ट्विटमध्ये प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कोणताही आदेश किंवा एफआयआर (FIR) नसतानाही मला गेले 28 तास कोठडीत ठेवलं आहे. पण अन्नदात्याला चिरडणाऱ्या आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही? दुसऱ्या एका व्हिडिओत प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. मोदीजी नमस्कार, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही लखनऊला येत आहात, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का? तुमच्या सरकारमधील मंत्र्याच्या मुलाच्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडलं जात आहे. हा व्हिडिओ पाहा आणि देशासमोर सांगा की अद्याप या मंत्र्याला निलंबित का केलेलं नाही आणि यांच्या मुलाला अटक का करण्यात आलेलं नाही. तुम्ही माझ्यासारख्या विरोधी नेत्यांना कोणत्याही आदेशाशिवाय, कोणत्याही एफआयआरशिवाय कोठडीत ठेवले आहे. आणि हा व्यक्ती मुक्त का आहे?