VIDEO : लखीमपूर हिंसेचा व्हिडिओ व्हायरल, शेतकऱ्यांना चिरडताना दिसली गाडी

लखीमपूर खेरी हिंसाचारावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच आता व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Updated: Oct 5, 2021, 02:57 PM IST
VIDEO : लखीमपूर हिंसेचा व्हिडिओ व्हायरल, शेतकऱ्यांना चिरडताना दिसली गाडी title=

लखनऊ :  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) इथल्या हिंसाचारावरुन राजकीय वातावरण तापलं आहे.  त्यातच आता सीतापूरमध्ये (Priyanka Gandhi) पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शेतकरी आंदोलकांमध्ये वेगाने येणारी एक जीप घुसवण्यात आली आणि शेतकऱ्यांना अक्षरश: चिरडल्याचं दिसत आहे. प्रियंका गांधी यांच्या व्यतिरिक्त अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. झी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

व्हायरल व्हिडिओत काय आहे?

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक जीप येताना दिसत आहे. या जीपची पुढची काच फुटलेली आहे. व्हिडिओत आंदोलक शेतकरी काळे झेंडे घेऊन जात असताना दिसत असून मागून येणारी जीप शेतकऱ्यांना चिरडून जाताना दिसत आहे. जीपच्या मागे एक कारही वेगाने जातना दिसतेय.

प्रियंका गांधी यांनी उपस्थित केले प्रश्न

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत काही प्रश्न विचारले आहेत. या ट्विटमध्ये प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने  कोणताही आदेश किंवा एफआयआर (FIR) नसतानाही मला गेले 28 तास कोठडीत ठेवलं आहे. पण अन्नदात्याला चिरडणाऱ्या आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही? दुसऱ्या एका व्हिडिओत प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. मोदीजी नमस्कार, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही लखनऊला येत आहात, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का? तुमच्या सरकारमधील मंत्र्याच्या मुलाच्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडलं जात आहे. हा व्हिडिओ पाहा आणि देशासमोर सांगा की अद्याप या मंत्र्याला निलंबित का केलेलं नाही आणि यांच्या मुलाला अटक का करण्यात आलेलं नाही.  तुम्ही माझ्यासारख्या विरोधी नेत्यांना कोणत्याही आदेशाशिवाय, कोणत्याही एफआयआरशिवाय कोठडीत ठेवले आहे. आणि हा व्यक्ती मुक्त का आहे? 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कठोर कारवाईची ग्वाही

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.  याशिवाय निवृत्त न्यायाधिशांमार्फत संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाईल, हिंसाचारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 45 लाख रुपये आणि जखमींना 10 लाख रुपये दिले जाणार आहेत.