देश बदल रहा है! इंग्लंड सोडून 'तो' करतोय भारतात शेती

परदेशी बळीराजाची देशी शेती..

Updated: Mar 15, 2019, 08:03 AM IST
देश बदल रहा है! इंग्लंड सोडून 'तो' करतोय भारतात शेती title=

पुदुच्चेरी : 'बळीराजाचं राज्य येऊ दे....' असं म्हणत अनेकदा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांना प्राधान्य दिलं गेलं. राजकीय नेतेमंडळींपासून ते देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत अनेकांनाच या बळीराजाविषयी आपुलकी आहे. ही आपुलकी आता थेट परदेशापर्यंत जाऊन पोहोचली आहे. खरंतर ती आता पोहोचली आहे, असं म्हणण्यापेक्षा गेल्या कित्येक वर्षांपासून ही भावना अशी काही आकारास आली की, ती खऱ्या अर्थाने मातीत रुजली आणि तिला बहरही आला. २६ वर्षांपूर्वी मुळचा युकेचा असणाऱ्या कृष्णा मॅककेंझी Krishna Mckenzie भारतात आला आणि त्याने सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. पुदुच्चेरितील ऑरुविल्ले येथे त्याने ही संकल्पना राबवली. 

एएनआयशी संवाद साधताना त्यांनी याविषयीची माहिती दिली. इंग्लंडमध्ये अनेकदा अन्नपदार्थांची मिर्मिती मुळात कशी होते हेसुद्धा ठाऊक नसतं ही वस्तुस्थिती सुद्धा त्यांनी मांडली. सोशल मीडियावर त्यांची ही सेंद्रीय शेती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 'द बेटर इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 'निसर्ग हा सर्वगुणसंपन्न असून, त्यात आणखी बदल घडवून आणण्याची काहीच गरज नाही', या एका तत्वावर कृष्णाने सेंद्रीय शेतीची सुरुवात केली. शेतीच्या विविध बाबी लक्षात घेत त्याने या क्षेत्रात प्रगतीपथावर वाटचाल सुरू केली. आजच्या घडीला त्यांनी जवळपास १४० विविध जातीची फळझाडं, फुलझाडं, तेलबिया, धान्याचं उत्पादन घेतलं. सिताफळापासून ते आंबा, पपई, पेरु, गाजर, कारलं, भोपळा, हळद अशी विविध पिकं घेण्य़ास त्यांनी सुरुवात केली. 

कृष्णा यांच्या शेतात उगवणाऱ्या या प्रत्येक पदार्थाची चव त्यांच्या कॅफेमध्ये चाखता येते. पर्यटकांसाठी त्यांचा कॅफे हा प्रमुख आकर्षणाचा विषय ठरतो. या कॅफेमध्ये त्यांच्या शेतात उगवलेली प्रत्येक गोष्ट ही थेट तुमची भूक भागवण्यासाठी थेट तुमच्या पुढ्यात असणाऱ्या ताटात वाढली जाते. परदेशी बळीराजाची ही देशी शेती खऱ्या अर्थाने देश भदल रहा हैचं... एक सुरेख उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही.