चिपको आंदोलन | जेव्हा झाडं तोडण्यासाठी कुऱ्हाडी सरसावल्या, महिलांनी झाडांना घेराव घातला

चिपको आंदोलन म्हणजे नेमकं काय? सुंदरलाल बहुगुणा यांनी त्यात काय कामगीरी बजावली हे जाणून घ्या.

Updated: May 23, 2021, 08:48 PM IST
चिपको आंदोलन | जेव्हा झाडं तोडण्यासाठी कुऱ्हाडी सरसावल्या, महिलांनी झाडांना घेराव घातला title=

दिल्ली : चिपको आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडणारे सुंदरलाल बहुगुणा यांच्यावर दिल्लीतील एम्स येथे उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचे निधन झाले आहे. सुंदरलाल बहुगुणा यांनी पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. सत्तरच्या दशकात त्यांनी पर्यावरण क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली. चिपको आंदोलनातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि हे आंदोलन देशभर वाढवले. चिपको आंदोलन म्हणजे नेमकं काय? सुंदरलाल बहुगुणा यांनी त्यात काय कामगीरी बजावली हे जाणून घ्या.

चिपको आंदोलन म्हणजे काय?

चिपको आंदोलनाची सुरूवात 1972 पासून झाली. चमोली जिल्ह्यातील गोमपेश्वर येथे 23 वर्षीय विधवा महिला गौरा देवी यांनी जंगलांची बेकायदेशीर पणे होणारी कत्तल रोखण्यासाठी ही चळवळ सुरू केली होती. या चळवळीअंतर्गत झाडांच्या संरक्षणासाठी ग्रामस्थ झाडांना चिपकून उभे राहत असत.

सरळ शब्दांत सांगायचे तर, या चळवळीत जंगलतोड रोखण्यासाठी, गावातील पुरुष आणि स्त्रिया झाडांना चिकटून राहायचे आणि ठेकेदारांना झाडे तोडू देत नव्हते. ज्यावेळेस ही चळवळ सुरु होती, त्यावेळी केंद्राच्या राजकारणातही पर्यावरण एक अजेंडा बनला होता.

‘हिम पुत्रियों की लरकार, वन नीति बदले सरकार, वन जागे वनवासी जागे’, ‘क्या है इस जंगल के उपकार मिट्टी, पानी और बयार, जिंदा रहने के आधार’ या घोषणा त्यावेळी चिपको आंदोलनात दिल्या गेल्या आणि देशातील जंगले वाचवण्यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न केले गेले.

चिपको आंदोलनामार्फत लोकांमध्ये जागरुकता आणि त्याचं महत्व सांगण्यासाठी पर्यावरणप्रेमी सुंदरलाल बहुगुणा आणि चंदीप्रसाद भट्ट यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या आंदोलनानंतर केंद्र सरकारला वन संरक्षण कायदा लागू करावा लागला.

या आंदोलनापूर्वी वन संरक्षण कायदा भारतात नव्हता. असे म्हटले जाते की, चिपको आंदोलनामुळे 1980 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एक विधेयक तयार केले होते. या विधेयकात हिमालयीन प्रदेशातील जंगले तोडण्यास 15 वर्षे बंदी घालण्यात आली होती.

सुंदरलाल बहुगुणा यांची समाजसेवा आणि पर्यावरण संरक्षणात भूमिका

सुंदरलाल बहुगुणा यांनी लहान वयातच टिहरीच्या आसपासच्या भागात दारु विरोधात लढा सुरु केला. 1960 च्या दशकात त्यांनी आपले लक्ष जंगले आणि झाडांच्या संरक्षणाकडे केंद्रित केले. 1980 च्या दशकाच्या सुरूवातीला बहुगुणा यांनी हिमालयात 5 हजार किलोमीटरचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक गावांचा दौरा केला आणि लोकांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

टिहरी धरणाच्या विरोधातही सुंदरलाल बहुगुणा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी अनेकदा उपोषण केले. तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या कारकीर्दीत ते दीड महिना उपोषणावर गेले. त्यानंतर 2004 मध्ये धरणाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.