मुंबई : भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाला त्यांची दत्तक मुलगी नमिता भट्टाचार्य यांनी मंत्राग्नी दिला. यावेळेस नमिता यांच्यासोबत त्यांचे पतीही उपस्थित होते. लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अटलजींचे आयुष्य खुल्या पुस्तकाप्रमाणे वाटत असले तरी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी खूप कमी लोकांना ठाऊक आहेत. नमिता भट्टाचार्य यांना अटलजींनी दत्तक घेतले होते. अटलजीं अविवाहीत होते, हे सर्वश्रूत आहे. तरिही त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले होते. तर जाणून घेऊया त्यांच्या या मुलीबद्दल...
उत्तर प्रदेशातील बटेश्वर हे अटलजींचे गाव. ग्वालियरमध्ये २५ डिसेंबर १९२४ मध्ये त्यांचा जन्म झाला. तेथील व्हिक्टोरिया कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. अटलजींचे जीवन राजकारण, कविता आणि साधेपणा यांनी भरलेले होते. तरिही अटलजींच्या आयुष्यातील एका रहस्याचा उलघडा अजूनही झालेला नाही. तो म्हणजे त्यांनी लग्न का केले नाही? एका विपक्षीय वादात त्यांना अविवाहीत असण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ''मी अविवाहीत जरुर आहे, पण ब्रम्हचारी नाही.''
त्याचबरोबर जेव्हा केव्हा त्यांना लग्नाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी अत्यंत शांततेने आणि संयमाने उत्तर दिले की, ''सतत व्यस्त असल्याने ते शक्य झाले नाही.'' पण हे बोलताना नेहमीच ते हळूच हसायचे. तर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कामासाठी आजीवन अविवाहीत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे त्यांच्या जवळ्यांचे म्हणणे होते.
कॉलेजमध्ये असताना अटलजींची एक खास मैत्रिण होती राजकुमारी कौल. कॉलेजमध्ये दोघेही एकत्र शिकत होते. अटलजींवर लिहिलेल्या पुस्तकात ‘अटल बिहारी वाजपेयीः ए मॅन ऑफ आल सीजंस’मध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.
त्यानंतर कालांतराने अटलजी राजकारणात सक्रिय झाले आणि याच दरम्यान कौल यांच्या वडीलांनी त्यांचे लग्न प्रोफेसर ब्रिज नारायण कौल यांच्याशी करुन दिले. पण अटलजी आणि राजकुमारी कौल यांचे संबंध कधी चर्चेचे कारण ठरले नाही. पण २०१४ मध्ये राजकुमारींचे निधन झाल्यावर अनेक वृत्तपत्रांनी ती बातमी प्रामुख्याने छापली.
राजकुमारी आणि अटलींचे नाते इतके तरल होते की, त्याबद्दल राजकुमारी यांच्या पतीला कोणताही आक्षेप नव्हता. ८० च्या दशकात एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत राजकुमारी यांनी सांगितले की, आमचे नाते इतके मजबूत आहे की, मला अटलजींसोबत असलेल्या नात्याबद्दल माझ्या पतीला कधी स्पष्टीकरण द्यावे लागले नाही.
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर राजकुमारी कौल आपली मुलगी नमिता आणि जावई रंजन भट्टाचार्य यांच्यासह सरकारी निवासात राहात होत्या. तेव्हा अटलजींनी नमिताला मानसपुत्री मानले. म्हणून अटलजींनी लग्न केले नसले तरी नमिता भट्टाचार्य त्यांची मुलगी आहे.