तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हैदराबाद येथील घऱी रात्री 2 वाजता ते घसरुन पडल्याने जखमी झाले आहेत. बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्यानंतर त्यांना यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं असून, त्यांच्या पार्श्वभागाचं हाड तुटल्याचं आढळलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकरणांमध्ये सर्जरीची गरज असून, रुग्णाला पूर्णपणे बरं होण्यासाठी 6 ते 8 आठवडे लागतात. निवडणुकीतील पराभवानंतर के चंद्रशेखर राव गेल्या 3 दिवसांपासून आपल्या घरी लोकांच्या भेटीगाठी घेत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केसीआर यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. "तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांना दुखापत झाल्याचं ऐकून मला दु:ख झालं आहे. ते लवकर बरे व्हावेत आणि चांगल्या आरोग्यासाठी माझ्या शुभेच्छा," अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी एक्सवर शेअर केली आहे.
केसीआर यांनी 2014 ते 2023 पर्यंत तेलंगणाचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा पराभव केला. केसीआर तेलंगणातील दोन जागांवरून लढले. गजवेल मतदारसंघातून ते जिंकले मात्र कामारेड्डी मतदारसंघात पराभूत झाले. भाजपाच्या कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी यांनी कामरेड्डीमध्ये त्यांचा पराभव केला.
काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 11 मंत्र्यांनीही शपथ घेतली. तेलंगणात काँग्रेसने 119 पैकी 64 जागा जिंकल्या आहेत. तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर बीआरएसचा पहिल्यांदाच पराभव झाला आहे.