Karnataka Election 2023: कर्नाटकमध्ये (Karnataka) सत्ता राखण्याचं आव्हान भाजपासमोर असून यासाठी पक्षाने कसून तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे स्टार प्रचारक कर्नाटकमध्ये तंबू ठोकून आहेत. तसंच काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहा दिवसांत तब्बल 15 सभा आणि रोड शो होणार आहेत. यामुळे भाजपाच्या प्रचारमोहिमेला मोठं पाठबळ मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी 28 एप्रिलपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. 7 मेपर्यंत हा प्रचार सुरु राहणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहा दिवसांत 12 ते 15 प्रचारसभा, रोड शो होणार आहेत. माहितीनुसार, नरेंद्र मोदी 28 एप्रिल, 29 एप्रिल, 3 मे, 4 मे, 6 मे आणि 7 मे रोजी प्रचार करणार आहेत. यादरम्यान एकूण 12 ते 15 सभा होतील. याशिवाय काही रोड शोदेखील होणार आहेत.
करोना झाल्याने गेल्या आठवड्याभरापासून विश्रांती घेणारे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंगदेखील प्रचारात सहभागी होणार आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात सहभागी होणार असल्याने सर्वांमध्ये उत्साह आहे. कारण मोदींच्या येण्याने भाजपामध्ये वातावरण तयार झालं आहे," असं राजनाथ सिंग म्हणाले आहेत.
कर्नाटकची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीआधीची रंगीत तालीम असल्याचं बोललं जात आहे. यामुळेच भाजपा दुसऱ्या राज्यांच्या तुलनेत कर्नाटकवर जास्त लक्ष केंद्रीत करत आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता यावी यासाठी पक्ष प्रयत्न करत आहे. तसंच आपण पूर्ण बहुमताने जिंकू असा विश्वासही भाजपा व्यक्त करत आहे.
कर्नाटक जिंकण्यासाठी भाजपाकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. यामुळेच भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहने आधीच राजकीय प्रचाराला सुरुवात केली आहे. अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्यासहित भाजपाचे ज्येष्ठ नेते आक्रमकपणे प्रचार करत आहेत.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. बेळगावातील चिकोडी, कित्तूर आणि कु़डाची यांचा मोदी दौरा करणार आहेत. याशिवाय मोदी उत्तर कन्नड जिल्ह्याचाही दौरा करणार आहेत. कर्नाटकात 10 मे रोजी एका टप्प्यात मतदान होणार आहे. 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.