Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Election) निमित्ताने सध्या भाजपा (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. भाजपासमोर कर्नाटकमध्ये सत्ता राखण्याचं आवाहन असून दुसरीकडे काँग्रेस भाजपाचा पराभव करत सत्तेत येण्याच्या प्रयत्नात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सध्या दोन्ही पक्षाचे मोठे नेते कर्नाटकात प्रचारसभांचा धडाका लावत आहेत. मात्र यादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) एका विषारी सापाप्रमाणे (poisonous snake) असल्याचं मल्लिकार्जून खर्गे म्हणाले आहेत. यानंतर भाजपा संतापली असून त्यांना प्रत्युत्तर देत आहे.
मल्लिकार्जून खर्गे हे कर्नाटकच्या गदाग येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की "मोदी हे विषारी सापाप्रमाणे आहेत. जर हे विष आहे की नाही असा विचार तुम्ही केलात आणि ते चाटले तर तुमचा मृत्यू होईल. तुम्हाला वाटेल हे विष आहे का? मोदी चांगले व्यक्ती आहेत, त्यांनी हे दिलं आहे आणि आम्ही ते पाहून घेऊन. असा विचार करत तुम्ही ते चाटले तर मग तुम्ही पूर्ण झोपेत आहात".
मल्लिकार्जून खर्गेंच्या विधानावर भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी टीका केली आहे. या विधानावरुन त्यांची हतबलता दिसत असून काँग्रेसच्या हातातून कर्नाटक सुटत असल्याचं समोर येत आहे. आणि याची पक्षाला जाणीव आहे अशी टीका अमिल मालवीय यांनी केली आहे.
"आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विषारी साप म्हणत आहेत. सोनिया गांधी यांच्या मौत का सौदागर विधानापासून सुरुवात झाल्यानंतर त्याचा शेवट कसा झाला याची सर्वांनाच कल्पना आहे. काँग्रेसची पातळी आणखीन घसरत आहे. या हतबलतेवरुन काँग्रेस कर्नाटक गमावत आहे आणि याची त्यांना जाणीव असल्याचं दिसत आहे," अशी टीका अमित मालवीय यांनी केली आहे.
Now Congress Presidnet Kharge calls Prime Minister Modi ‘poisonous snake’…
What started with Sonia Gandhi’s ‘maut ka saudagar’, and we know how it ended, the Congress continues to plummet to new depths.
The desperation shows Congress is losing ground in Karnataka and knows it. pic.twitter.com/75FECizSOW
— Amit Malviya (@amitmalviya) April 27, 2023
विधानावरुन वाद निर्माण होऊ लागल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपण नरेंद्र मोदी नव्हे तर भाजपा पक्षाबाबत हे विधान केलं होतं असा दावा त्यांनी केला आहे. "भाजपा सापाप्रमाणे आहे. जर तुम्ही जीभ लावली तर मृत्यू होईल. मी मोदींबद्दल बोललो नव्हतो. मी कधीही वैयक्तिक टीका करत नाही. त्यांची विचारसरणी सापाप्रमाणे आहे असं मला म्हणायचं आहे. तुम्ही जर ते चाटण्याचा प्रयत्न केला, तर मृत्यू अटळ आहे".