काँग्रेसचे ३ आमदार भाजपच्या संपर्कात, 'ऑपरेशन लोटस'मुळे कर्नाटक सरकार धोक्यात

कर्नाटकमधल्या जेडीएस-काँग्रेसच्या सरकारवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे ढग पसरू लागले आहेत.

Updated: Jan 13, 2019, 11:26 PM IST
काँग्रेसचे ३ आमदार भाजपच्या संपर्कात, 'ऑपरेशन लोटस'मुळे कर्नाटक सरकार धोक्यात title=

बंगळुरू : कर्नाटकमधल्या जेडीएस-काँग्रेसच्या सरकारवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे ढग पसरू लागले आहेत. काँग्रेसचे ३ आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेसचेच नेते आणि कर्नाटकमधले जलसंपदा मंत्री डी.के. शिवकुमार यांनी केला आहे. कर्नाटकमधील जेडीएस-काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरु आहेत. काँग्रेसचे ३ आमदार मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये भाजपच्या नेत्यांसोबत आहेत, असा आरोप शिवकुमार यांनी केला आहे.

आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न होत आहे. आमचे ३ आमदार भाजपच्या काही आमदार आणि नेत्यांसोबत मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये आहेत. तिकडे काय झालं आहे आणि आमदारांना किती रक्कम ऑफर केली आहे, हे सगळं मला माहिती आहे, असं शिवकुमार म्हणाले.

२००८ मध्ये येडियुरप्पा यांच्या सरकारनं सरकार स्थिर राहण्यासाठी विरोधी पक्षांमधल्या आमदारांना प्रलोभनं दिल्याचा आरोप होतो. या सगळ्याला ऑपरेशन लोटस नावानंही ओळखलं जातं.

दरम्यान मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी हे भाजपप्रती उदार झाल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला आहे. भाजपच्या या षडयंत्राबद्दल सगळ्या आमदारांनी कुमारस्वामी यांना आणि सिद्धरामैय्या यांना अवगत केलं आहे. मुख्यमंत्री 'वाट पाहा आणि बघत राहा'ची रणनिती अवलंबत आहेत. मी जर त्यांच्या जागी असतो, तर २४ तासांमध्ये याचा खुलासा केला असता, असं शिवकुमार म्हणाले. तरी भाजपला त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होता येणार नाही, असं शिवकुमार यांना वाटतं. भाजपनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.