नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने एकत्र येत निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या महाआघाडीत त्यांनी काँग्रेसला स्थान दिलेले नाही. या महाआघाडीत सपा-बसपा प्रत्येकी ३८ जागांवर लढणार आहे. तर दोन जागा महाआघाडीत सामील होणाऱ्या पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. या निर्णयानंतर काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सर्व ८० जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय. संपूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवू असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता यावेळीही आम्ही स्वबळावर लढून २००९ पेक्षा दुपट्ट जागा जिंकू असा विश्वास काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केला. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली आम्ही ही निवडणूक लढू आणि भाजपचा पराभव करू. निवडणुकांसाठी आमची तयारी पूर्ण झाल्याचं आझाद म्हणाले.
भाजपला हरवण्यासाठी जे पक्ष एकत्र लढू शकतात त्या सगळ्यांशी आम्हाला युती करायची होती, पण सपा-बसपानं वेगळा निर्णय घेतला आणि युती तोडली. ज्या पक्षांना आमची मदत करायची आहे, त्यांची मदत आम्ही घेऊ. त्यांच्या मदतीचा आम्ही सन्मानही करू, अशी प्रतिक्रिया आझाद यांनी दिली.
सपा-बसपानं उत्तर प्रदेशमध्ये युती केल्यानंतर पक्ष मुख्यालयात उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी गुलाम नबी आझाद, उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि पक्षाच्या मोठ्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर गुलाम नबी आझाद आणि राज बब्बर यांनी पत्रकार परिषद घेतली.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या आघाडीची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन या आघाडीची घोषणा केली.
उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा हे दोन्ही पक्ष प्रत्येकी ३८ जागा लढवणार असून, २ जागा मित्रपक्षांना देण्यात येतील. तर अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघात अनुक्रमे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही, असं सांगतानाच काँग्रेसच्या राजवटीत घोषित आणीबाणी होती, तर भाजपाच्या राजवटीत अघोषित आणीबाणी आहे, अशा शब्दांत मायावतींनी यावेळी जोरदार हल्ला चढवला. तर पुढचा पंतप्रधान उत्तर प्रदशेचाच असेल, असं अखिलेश यादव यांनी यावेळी सांगितलं.