Eknath Shind in Ayodhya: "संधीसाधू, पाठीत खंजीर खुपसणारे बाळासाहेबांचा..."; अयोध्या दौऱ्यानंतर शिंदेंवर शेलक्या शब्दांत टीका

Backstabber CM Shinde Cannot Carry Balasaheb Legacy: एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर राज्यसभेच्या खासदाराने ट्विटरवरुन पोस्ट करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

Updated: Apr 10, 2023, 01:09 PM IST
Eknath Shind in Ayodhya: "संधीसाधू, पाठीत खंजीर खुपसणारे बाळासाहेबांचा..."; अयोध्या दौऱ्यानंतर शिंदेंवर शेलक्या शब्दांत टीका title=
Eknath Shinde Ayodhya

Kapil Sibal Slams CM Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अयोध्येचा दौरा केला. मागील वर्षी जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे मुख्यमंत्री म्हणून अयोध्येला गेले होते. मात्र या दौऱ्यावरुन माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी शिंदेंवर टीका केली आहे. 'कट रचणारे, संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसणारे' असा एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत सिब्बल यांनी टीका केली. कट रचणारे, संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसणारे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे नेऊ शकणार नाहीत, असा टोला सिब्बल यांनी लगावला. 

एकनाथ शिंदे हे मागील वर्षी जून महिन्यात शिवसेनेच्या आमदारांबरोबर सुरतमार्गे गुवहाटीला गेला. त्यानंतर एक एक करत 40 शिवसेना आमदार आणि 12 खासदारांनी शिंदेंना साथ देत राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झालेल्या शिंदेंनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून अयोध्याचे दौरा केला. यावेळी शिंदे गटाबरोबरच भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही शिंदेंचं अयोध्येमध्ये जंगी स्वागत केलं.

शिंदेंचे समर्थकही यावेळेस हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते. शिंदेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली.

या घडामोडींनंतर कपील सिब्बल यांनी आज एक ट्वीट केलं आहे. "शिंदे अयोध्येत म्हणाले, प्रभू श्री रामाने बलिदान, सत्य आणि ईमानदारीचा मार्ग निवडला. बाळासाहेबांनी त्यांचे हीच त्रिसुत्री आत्मसात केली. मात्र कट रचणारे, संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसणारी व्यक्ती कधीच बाळासाहेबांचा वारसा पुढे नेऊ शकणार नाही," असं सिब्बल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अयोध्या दौऱ्यात शिंदे गटाबरोबरच महाराष्ट्र भाजपाने शक्तीप्रदर्शन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण यांच्याबरोबर भाजपाचे महाराष्ट्र सरकारमधील अनेक मंत्री या दौऱ्यात उपस्थित होते. आमची आणि भाजपाची एकच विचारसणी असून आम्ही पुढील वर्षींच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्यात भगवा फडकवू असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदेंनी या दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलातना व्यक्त केला.