नवी दिल्ली: गलवान खोऱ्यातील भारत आणि चीन यांच्यातील रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यामध्ये आता 'जेएनयू'तील विद्यार्थी संघटनेचा माजी नेता कन्हैया याचीही भर पडली आहे. कन्हैया कुमारने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
'घर में घुसकर मारुंगा' असे म्हणत सत्तेत आलेले २० जवानांच्या बलिदानानंतर 'घर में कोई घुसा ही नहीं' असे म्हणू लागले आहेत, असे कन्हैयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता भाजपकडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राहुल गांधींनी भारत-चीन संघर्षावर गलिच्छ राजकारण करणे सोडावे- अमित शहा
"घर में घुसकर मारूंगा" कहकर सत्ता में आने वाला हमारे 20 जवानों की शहादत के बाद कह रहा है कि "घर में कोई घुसा ही नहीं"
ये फेंकू ही नहीं, फट्टू भी है।
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) June 20, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी किंवा भारताची कोणतीही चौकी त्यांच्या ताब्यात गेलेली नाही, असे सांगत उपस्थितांना आश्वस्त केले होते. तसेच भारताची एक इंच जमीनही कोणीही बळकावू शकणार नाही. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर समर्थ असल्याचे मोदींनी सांगितले होते.
'मोदींच्या वक्तव्याचा खोडकर पद्धतीने अर्थ काढला', पंतप्रधान कार्यालयाचं स्पष्टीकरण
दरम्यान, भारत-चीन संघर्षानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने टीकेची तोफ डागत आहेत. आज सकाळीच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पंतप्रधान मोदींनी गलवान खोऱ्याचा प्रदेश चीनच्या ताब्यात जाऊन दिला. जर हा भूभाग चीनचाच होता तर मग आपले सैनिक कसे मारले गेले? आपले सैनिक नक्की कोणत्या जागी शहीद झाले, असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.