नवी दिल्ली : मुंबईच्या कमला मिल कंपाऊंडमधील एका पबमध्ये लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झालाय. यावर भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.
न्यूज एजन्सी ANI नुसार हेमा मालिनी यांनी या दुर्घटनेला मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला कारणीभूत ठरवलं आहे. हेमा मालिनी म्हणाल्या की, ‘याप्रकारच्या घटनांसाठी आपण पोलीस आणि सरकारला जबाबदार ठरवतो. पण सत्य हे आहे की, या घटना मुंबईत वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे होतात’.
त्या पुढे म्हणाल्या की, दुर्घटनेंच्या बाबतीत पोलीस चांगलं कार करत आहेत. पण मुंबईतील गर्दी इतकी वाढली आहे की, एक शहर संपलं की, दुसरं शहर सुरू होतं. जिकडे बघावं तिकडे बिल्डींग आणि घरं दिसतात. मुंबईचा विस्तार खूप जास्त होत आहे. मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्येवर नियंत्रण असलं पाहिजे. लोकसंख्येच्या आधारावर शहरांमध्ये पबला परवानगी मिळाली पाहिजे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या आगीच्या सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले असून याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच हॉटेलचे मालक किंवा संचालक दोषी असतील, तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.