Crime News: पंजाबमध्ये पोलिसांनी (Punjab Police) कबड्डी खेळाडू कुलविंदर सिंग किंदा (Kulwinder Singh Kinda) याला अटक केली आहे. आपल्याच आईवर हल्ला केल्याप्रकरणी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, कुलविंदरने आईवर हल्ला केल्यानंतर फेसबुक लाईव्ह केलं होतं. यामध्ये त्याने आपले काही शत्रू घरात घुसले असून त्यांनी धारदार शस्त्राने आईवर हल्ला केल्याचा दावा केला. पण नंतर पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
पोलिसांनी सांगितलं की, सुरुवातीपासून या प्रकरणात संशय होता. याचं कारण कुलविंदरने हल्ला झाल्यानंतर आईला रुग्णालयात नेण्याऐवजी फेसबुक लाईव्ह करत आपल्या शत्रूंना दोष देण्यास सुरुवात केली होती. दुसरीकडे व्हिडीओत रांचल कौर यांच्या छाती आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्याचं दिसत होतं. वेदना होत असल्यायने त्या अक्षरश: व्हिवळत होत्या आणि मदतीसाठी याचना करत होत्या. नंतर त्यांना लुधियाना येथील दयानंद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
डीएसपी मनजीत सिंग यांनी सांगितलं की, तपासादरम्यान कुलविंदर सिंग किंदा वगळता कोणीही घऱात प्रवेश केला नव्हता. "त्याला आईचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्याने जवळच्या मटणच्या दुकानातून कटर आणलं होतं. याच कटरने त्याने आईवर हल्ला केला. त्याने आईच्या छाती आणि डोक्यावर हल्ला केला. नंतर त्याने फेसबुक लाईव्ह करत आपले शत्रू असणाऱ्या तीन इतर कबड्डी खेळाडूंवर आरोप केला. पोलिसांची तपाशाची दिशा भटकवण्याचा त्याचा प्रयत्न होता. यासाठी तो खेळाडूंशी असणाऱ्या शत्रुत्वाचा वापर करुन घेत होता".
पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 308 (दोषी हत्येचा प्रयत्न), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 458 (रात्री लपून राहणे किंवा रात्री घर फोडणे) अंतर्गत एफआयआर बधनी कलान पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.